गणेशोत्सवाला गालबोट : ५ जणांचा बुडून मृत्यू, २ जण हरवले
अनंत चतुर्दशीला बाप्पाच्या विसर्जनाला सुरूवात झाली. आणि सगळीकडे एकच उत्साहाच वातावरण पाहायला मिळालं. पण असं असताना आता या आनंदाला गालबोट लागलं आहे.
औरंगाबाद : अनंत चतुर्दशीला बाप्पाच्या विसर्जनाला सुरूवात झाली. आणि सगळीकडे एकच उत्साहाच वातावरण पाहायला मिळालं. पण असं असताना आता या आनंदाला गालबोट लागलं आहे.
पैठण तालुक्यातील बिडकीन येथे शिवनाई तलावात घरगुती गणपती विसर्जनासाठी गेलेल्या ३ मुलांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मृत्यू झालेले तिघेही जण ८ ते १० वर्षांचे आहेत. आदर्श किर्तीशाई, सागर तेलभाते, राजेश गायकवाड अशी मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत. सर्वत्र गणपती विसर्जन सोहळा सुरु असताना त्याला गालबोट लावणारी घटना औरंगाबाद जिल्ह्यात घडली आहे.
नाशिकमध्ये गणपती विसर्जनादरम्यान एका २३ वर्षीय तरुणाचा सेल्फीच्या नादापायी नदीत बुडून मृत्यू झाला आहे. नाशिकमधील चेहेडी परिसरातील किशोन सोनार हा तरुण आपल्या आई वडिलांसोबत विसर्जनासाठी दारणा नदीपात्रात गेला होता. यावेळी सेल्फी घेण्याच्या नादात त्याचा तोल गेला आणि तो नदीत बुडाला. ही घटना दुपारी २ च्या सुमारास घडली. पुण्यात जगताप डेअरी येथे कस्पटे वस्ती या ठिकाणी २ युवक नदीत वाहून गेले आहेत. अग्निशमन दलाचे जवान त्यांचा शोध घेत आहेत.
बीड जिल्ह्यात गणपती विसर्जन करताना मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.माजलगाव तालुक्यातील उमरी येथे ही घटना घडली आहे. १५ वर्षाचा पांडुरंग महादेव धायतिडक असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. त्याला ६ बहिणी आहेत. या घटनेने उमरी गावावर शोककळा पसरली आहे.