Mumbai Goa Highway News : गणेशोत्सवाच्या आनंदी वातावरणाशी एकरुप झाल्यानंतर आता अनेक मुंबईकरांनी आणि कोकणात, किंवा आपआपल्या गावी गेलेल्या मंडळींनी शहराची वाट धरली आहे. काहीजण गौरीगणपती विसर्जनानंतरच घराच्या दिशेनं निघाले आहेत. पण, जी मंडळी अद्यापही परतीच्या प्रवासाला निघालेली नाहीत आणि मुंबई- गोवा महामार्गावरून ते परतीचा प्रवास करणार आहेत त्यांच्यासाठी ही महत्त्वाची बातमी. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

येत्या काही दिवासांमध्ये मुंबई- गोवा महामार्गावरून मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या मार्गांवर कमालीची वाहतूक कोंडी पाहायला मिळणार आहे. किंबहुना आताही परतीला निघालेल्या अनेकांनाच या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. रविवारी सकाळ पासूनच माणगाव, वडपाले आणि लोणेरे भागातून मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या रस्त्यांवर वाहनांच्या रांगा पाहायला मिळाल्या. त्यातच पावसाचीही हजेरी असल्यामुळं काही मिनिटांची ही वाट ओलांडण्यासाठी तास-दीड तासाचा वेळ दवडल्यानं प्रवाशांचा मनस्ताप झाला. 


रविवारप्रमाणंच गोवा मुंबईसह रायगड - मुंबई गोवा महामार्गावरही सोमवारी पुन्हा वाहतूक कोंडी उदभवल्याचं पाहायला मिळालं. गणेशोत्सव आटोपून परतणाऱ्या चाकरमान्यांची यामुळं तासनतास रखडपट्टी झाली. नागोठणे ते आमटेम दरम्यान वाहनांच्या लांबलचक रांगा यावेळी पाहायला मिळाल्या. इथं महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू असल्याने एकाच मार्गिकेवरून दुहेरी वाहतूक सुरु आहे. त्यातच काही बेशिस्त वाहन चालकांचा वाहतुकीला फटका बसत असून, शहराच्या दिशेनं निघालेल्या चाकरमान्यांचा मोठा खोळंबा होताना दिसत आहे. 


हेसुद्धा वाचा : SBI पासून HDFC पर्यंत अनेक बँकांमध्ये नवा नियम लागू, खातेधारावर थेट परिणाम 


 


खड्ड्यांमुळं विघ्नांमध्ये भर...


फक्त वाहतूक कोंडीच नव्हे, तर मुंबई- गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांपुढं असणारं आणखी एक विघ्न म्हणजे रस्त्यांवरील खड्डे. अरुंद रस्ता असणाऱ्या अनेक भागांमध्ये एकिकडे वाहतूक कोंडी झालेली असतानाच दुसरीकडे रस्त्यांवर असणारे खड्डे वाहन चालकांसह प्रवाशांच्या परिसीमेचा अंत पाहत आहेत.