पुणे : Ganpati Festival:  राज्यात कोरोनाचा धोका कायम आहे. कोरोना (Coronavirus) रुग्णसंख्या वाढत असल्याने काही निर्बंध लागू करण्यात आले आहेत. गणपती उत्सवानिमित्ताने पुणे शहरामध्ये जमावबंदीचे आदेश लागू करताना 10 सप्टेंबर ते 19 सप्टेंबरपर्यंत 144 कलम लावण्यात आले आहे. (Ganpati Festival: Curfew order in Pune city)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणपती उत्सवानिमित्त जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत, अशी माहिती पुणे शहर पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी दिली. त्यांनी जमावबंदीचे आदेश जारी केले आहेत. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून पोलीस आयुक्तालय क्षेत्रात जमावबंदी, प्रार्थनास्थळंबंद ठेवण्यासंबंधी तसेंच संचारास मनाई करणारे आदेश लागू केले आहेत.


दरम्यान, पुणे शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत, सार्वजनिक ठिकाणी, सार्वजनिक गणेश मंडळाच्या समोर ज्वालाग्रही (रॉकेल, डिझेल, पेट्रोल, गॅस आदी) पदार्थाच्या सहाय्याने आगीचा लोळ निर्माण करण्यास किंवा हवेत सोडण्यास मनाई आहे. हा आदेश 10 सप्टेंबर ते 19 सप्टेंबरपर्यंत लागू असणार आहे. आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला आहे.


मानाच्या गणपतींची प्रतिष्ठापना साधेपणाने


दरम्यान, मानाच्या गणेश मंडळांसह सर्व सार्वजनिक मंडळांच्यावतीने यावर्षीही उत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मानाच्या पाच गणपतींसह प्रमुख गणेश मंडळांच्या गणेशाची प्राणप्रतिष्ठापना शुक्रवारी दुपारपर्यंत होणार आहे. प्रतिष्ठापनेआधी मिरवणूक निघणार नसली, तरी या गणपतींचे दर्शन ऑनलाइन माध्यमातून घेता येणार आहे. मानाचा पहिला कसबा गणपती, दुसरा तांबडी जोगेश्वरी, तिसरा गुरुजी तालीम यांच्या फेसबुक पेजवर, तर तुळशीबाग मंडळाच्या यूटय़ूब पेजवर प्रतिष्ठापनेचा सोहळा आणि ‘श्रीं’च्या दर्शनाची सोय उपलब्ध करण्यात आली आहे.