अरुण मेहेत्रे, झी २४ तास, पुणे : पुण्याच्या येरवडा कारागृहात सध्या प्रचंड तणावाचं वातावरण आहे. कारागृहातील कैद्यांमध्ये तुफान हाणामाऱ्या सुरु आहेत. त्यात दोन गटांचे म्होरके गंभीर जखमी झाल्यानं तणाव आणखी वाढलाय. पुण्यातील येरवडा कारागृहात सध्या टोळीयुद्ध भडकलंय. गेल्या २ जुलैला खुनाच्या गुन्ह्यातील कैदी तुषार हंबीर याच्यावर तीक्ष्ण खिळ्यांनी हल्ला करण्यात आला. त्याचा बदला घेण्यासाठी हंबीरच्या साथीदारांनी शाहरुख अस्लम खान याच्यावर हल्ला चढवला... एवढंच नव्हे तर त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करणाऱ्या कारागृह कर्मचाऱ्यावरही हल्ला चढवला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या घटनेनंतर कारागृहातील बंदोबस्त वाढवण्यात आला. हंबीरच्या १४ समर्थक कैद्यांची कोल्हापूर कारागृहात रवानगी करण्यात आली. मात्र, त्याचा काहीच उपयोग झाला नाही. कारण दुसऱ्या दिवशी बुधवारी सकाळी कारागृहात आणखी भयानक राडा झाला. हंबीर समर्थक टोळक्यानं सांगलीतील गुंड महम्मद जमाल नदाफ याच्यावर खुनी हल्ला केला. नदाफला दगड, विटांनी मारहाण करण्यात आली. सध्या तो ससूनच्या अतिदक्षता विभागात अखेरच्या घटका मोजतोय. लागोपाठ दोन दिवसांत घडलेल्या हल्ल्याच्या तीन घटनांमुळं कारागृह हादरून गेलंय.


कारागृह विभाग तसेच शहर पोलिसांची बुधवारी रात्री उशिरापर्यंत येरवडा कारागृहात धावपळ सुरु होती. दोन दिवसांत घडलेल्या या घटनांप्रकरणी येरवडा पोलीस स्टेशनमध्ये विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यानुसार पुढील कायदेशीर कारवाई होईल.



कारागृहात कैद्यांमधील होणाऱ्या हाणामाऱ्या काही नवीन नाहीत. गुंड आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक एकत्र आल्यांनतर अशा घटना घडण्याची शक्यता अधिकच असते. मात्र त्याला टोळीयुद्धाचं स्वरूप येणं, ही गंभीर बाब म्हणावी लागेल. येरवडा कारागृहावर नेमका अंकुश कुणाचा? तुरूंग अधिकाऱ्यांचा की गुंडांचा? असा सवाल देखील यानिमित्तानं उपस्थित होतोय.