आतिष भोईर, कल्याण : आधीच कोरोना आणि त्यापाठोपाठ आलेल्या लॉकडाऊनमुळे कल्याणमधील कुंभार आणि मूर्तिकार बांधव अडचणीत आले आहेत. त्यात आता कल्याण-डोंबिवलीतील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बुक केलेल्या गणेश मूर्तींच्या ऑर्डर रद्द होत असल्याने कल्याणमधील मूर्तिकारांवरील संकट आणखीन गडद झाले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यंदाचे वर्ष हे प्रत्येक क्षेत्र, प्रत्येक व्यक्तीसाठी अत्यंत कठीण असं ठरत आहे. कोरोना नावाच्या विषाणूने जनजीवन विस्कळीत झालं आहे. कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात संपूर्ण व्यवहार बंद असल्याने पिढीजात व्यवसाय असणाऱ्या कल्याणमीधल मूर्तिकारांवर उपासमारीची वेळ आली. पण अनलॉक सुरु झाल्यानंतर मूर्तिकारांनी काहीसा सुटकेचा निश्वास सोडला. पण कोरोना रुग्णांची वेगाने वाढणारी संख्या पुन्हा एकदा संकट घेऊन आली.


कल्याण डोंबिवलीतील कोरोनाचे वेगाने वाढणारे रुग्ण पाहता मूर्तिकारांकडे बुक केलेल्या गणेशमूर्ती आता रद्द केल्या जात आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता त्याचा संसर्ग होण्याच्या भीतीने मुंबईतील अनेक मंडळांनी आपल्या ऑर्डर रद्द केल्याची माहिती इथल्या मूर्तिकारांनी दिली.


एकीकडे वाढत जाणारा कोरोना, दुसरीकडे ऑर्डर रद्द होत असल्याने निर्माण झालेले आर्थिक संकट अशा दुहेरी संकटाच्या कात्रीत कल्याणमधील मूर्तिकार बांधव सापडले आहेत.