महाराष्ट्रातील गडांवरचे गणपती; हरिश्चंद्रगडावरील दगडात कोरलेली शस्त्रधारी गणेश मूर्ती
हरिश्चंद्रगडावरील गपणतीची मूर्ती कशी आली याचा इतिहास कुणालाच माहित नाही. मात्र, ही मूर्ती हरिश्चंद्रगडाचे प्रमुख आकर्षण आहे.
Harishchandragad Ganpati : गिर्यारोहकांची पंढरी म्हणून किल्ले हरिश्चंद्रगडाची ओळख आहे. या किल्ल्यावरचा निसर्ग, मानवनिर्मित कलाकृती सगळंच अदभूत आहे. हरिश्चंद्रगडावरचा गणपती हे देखील गडावर येणाऱ्या पर्यटकांचे तसेच गिर्यारोहकांचे प्रमुख आकर्षण आहे. जाणून घेऊया हरिश्चंद्रगडावरील गणपती मंदिराविषयी.
ठाणे, नगर आणि पुणे जिल्ह्याच्या सीमा जिथे एकत्र येतात, त्या सह्याद्रीच्या डोंगर धारेवर हरिश्चंद्रगड उभा आहे. पुराणापासून या हरिश्चंद्रगड आणि परिसराचे उल्लेख आहेत. नगरमधल्या राजूर - पाचनई मार्गे तर मालशेज घाटाच्या पुढे असलेल्या खुबी फाटा - टोलार खिंडी मार्गे हरिश्चंद्रगड गाठता येतो. गडावर पोहचतांनाची वाट, निसर्ग सारं काही प्रेमात पाडणार आहे.
हरिश्चंद्रगड म्हंटल की पहिला आठवतो तो कोकणकडा. सुमारे एक किलोमीटरचा अर्ध वुर्तळाकार हा कडा तब्बल 1700 फुट खोल आहे. कोकणकड्यावर कुठल्याही ऋतूमध्ये जा. तो फारच देखणा दिसतो. गडावरचं हरिश्चंद्रेश्वराचं हे मंदिर म्हणजे तर थक्क करणारा मानवी कलाकृतींची नमुना. इथलं नक्षीकाम फारच आखीव रेखीव आणि सुंदर आहे. हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या बाजूनं मंगळगंगा नदी वाहते. त्यावर छोटासा दडगी पूल बांधला आहे. मंदिरासमोरची सप्ततीर्थ नावाची पुष्परणी, परिसरातली मंदिरं, गडावरची राहिदास -तारामती ही उंच शिखरं, केदारेश्वर गुहा आणि गुहेतल्या थंड पाण्यानं वेढलेली शंकराची पिंडी हे सगळं फारच अप्रितम आहे. निसर्गरम्य अशा या वातावरणात चांगदेवांचं बराच काळ वास्तव्य होतं.
हरिश्चंद्रेश्वर मंदिरापासून हाकेच्या अंतरावर तारामती शिखराच्या पोटात लेण्यांचा समूह आहे. इथे एका लेणीमध्ये चक्क दोन मीटर उंचीची दगडात कोरलेली शस्त्रधारी गणेश मूर्ती आहे. एकटक बघत बसावं इतकी ही मूर्ती सुंदर आहे. गणपतीच्या मूर्तीवर कुठलंही वस्त्र नाही. धडाच्या मानाने गणपतीचं डोकं मोठं आहे. चेहरा थोडासा उग्र आहे. या गणेशाची इथे कोणी स्थापना केली याची इतिहासात नोंद नाही. हरिश्चंद्रगडावर इतर ठिकाणीही काही गणेश मूर्तींची मंदिरं आढळतात.
किल्ले हरिश्चंद्रगडाचा फेरा मोठा असल्यानं गड फिरण्यासाठी किमान एक दिवस सहज लागतो. हा भाग मानवी वस्तीपासून काहीशा आडवळणाला आहे. त्यामुळे गडावर पोहोचणं, गड पाहणं यात तीन दिवस सहज जातात. तीन दिवस सवड काढा आणि हरिश्चंद्रगडावर फेरफटका मारा.