बाप्पा पावला । कोकण रेल्वे मार्गावर गणपती सणासाठी विशेष गाड्यांची शक्यता
कोकणात गणपती सणासाठी जाणाऱ्यांसाठी कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्या सोडण्यात येण्याची शक्यता आहे.
मुंबई : कोविड-१९ संकटामुळे रेल्वेची सेवा बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे गणपती उत्सवासाठी जाण्यासाठी रस्ता वाहतुकीचा पर्याय आणि त्यात मुसळधार पाऊस यामुळे कोकणात पोहोचायचे कसे, असा प्रश्न मुंबईकर चाकरमान्यांना पडला होता. त्यात ई-पासचे बंधन. त्यामुळे कात्रित सापडलेल्या गणेशभक्तांसाठी एक चांगली बातमी आहे. कोकणात गणपती सणासाठी जाणाऱ्यांसाठी कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्या सोडण्यात येण्याची शक्यता आहे. याबाबत राज्य सरकारकडून रेल्वे प्रशासनाला पत्र पाठविण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाकडून सज्जता ठेवण्यात येत आहे. रेल्वेकडून अद्याप अधिकृत काहीही सांगण्यात आले नसले तरी लवकरच माहिती मिळेल, असे संकेत देण्यात आले आहेत.
राज्य सरकारकडून कोकणात गणपतीसाठी जाणाऱ्यांसाठी विशेष एसटीच्या गाड्या सोडल्या जात आहेत. सुमारे ३ हजार एसटी सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. यात २२ प्रवाशांच्या ग्रुप बुकिंगचा पर्यायही ठेवण्यात आला आहे. मुसळधार पावसाने विश्रांती घेतल्याने काही गाड्या कालपासून कोकणच्या वाटेवर मार्गस्थ झाल्या असतानाच गणपती विशेष रेल्वेसंदर्भात बातमी चाकरमान्यांना मिळण्याची शक्यता आहे.
गणपतीसाठी विशेष गाड्या सोडण्याची तयारी रेल्वेने सुरु केल्याची माहिती आहे. राज्य सरकारच्यावतीने मध्य रेल्वेला पत्र दिले गेले आहे. या पत्राला रेल्वेकडून प्रतिसाद मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. येत्या दोन दिवसांत कोकण रेल्वे मार्गावर काही विशेष गाड्यांबाबत अधिकृत घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. या गाड्यांसाठी आरक्षण असेल आणि तिकीट हाच ई-पास मानला जाईल, असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे रेल्वे सुरु झाल्या तर कोकण रेल्वेने गणपतीसाठी जाता येणार आहे.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. थर्मल स्क्रीनिंग, सोशल डिस्टन्सिंग तसेच रेल्वे सॅनिटायझर करण्यात यावी, असे स्पष्ट निर्देशही देण्यात आले आहेत. या सर्व बाबी काटेकोरपणे पाळल्या जातील, असेही सांगण्यात येत आहे. दरम्यान, कोकण रेल्वे मार्गावर या गाड्या नेमक्या कोणत्या तारखेपासून सोडल्या जाणार. या गाडीतून जाणाऱ्या प्रवाशांसाठी क्वारंटाइन कालावधी किती असणार याबाबत मात्र लवकरच घोषणा होऊ शकते.
दरम्यान, कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात याव्यात अशी मागणी आधीच कोकण रेल्वे प्रवासी संघाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. मुंबईतून गावी जाणाऱ्या चाकरमान्यांना क्वारंटाइन राहावे लागणार असल्याने याबाबत तातडीने पावले उचलाण्याची विनंतीही मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे करण्यात आली होती.
२२ ऑगस्टपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. १४ दिवसांच्या क्वारंटाईनची अट ठेवली होती. त्यात घट करुन १० दिवसांची करण्यात आली आहे. मात्र, अनेक ग्रामपंचायतींचा विरोध असल्याने ही अट १४ दिवसांची राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही खासगी वाहनांनी अनेकांनी कोकण गाठले. त्यापाठोपाठ नुकतीच एसटी सोडण्याचीही घोषणा करण्यात आली.