प्रणव पोळेकर, झी मीडिया रत्नागिरी : अतिवृष्टीचा फटका गणपतीपुळे येथील देवस्थानलाही बसला आहे. भक्तांसाठी उभारण्यात आलेल्या प्रदक्षिणा मार्गाची संरक्षक भिंत खचल्याने मोठे नुकसान झाले आहे. ठिकठिकाणी ही भिंत कोसळून प्रदक्षिणा मार्ग खचला आहे. तर तलावाचीही संरक्षक भिंत कोसळली आहे. त्यामुळे देवस्थानचे मोठे नुकसान झाले आहे. गणपतीपुळे येथे एका बाजूला समुद्राच्या लाटांच्या माऱ्यामुळे नुकसान होत आहे, तर दुसरीकडे मुसळधार पावसामुळे गणपतीपुळे देवस्थानचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मालगुंड परिसरातील काही घरांमध्ये देखील पाणी शिरले होते. विजांच्या कडकडाटासह दक्षिण रत्नागिरीसह गुहागर दापोलीमध्ये पावसाने चांगलीच हजेरी लावली. रत्नागिरी, लांजा आणि राजापूर, गुहागर तसेच दापोलीमध्ये पावसाने चांगलीच बॅटिंग केली. त्यामुळे दक्षिण रत्नागिरीमधील जनजीवन विस्कळीत झाले होते.


मुसळधार पावसामुळे रत्नागिरी बाजारपेठेत पाणी साचले. तसेच मुख्य रस्त्यासह शहराच्या  विविध भागात पाणी तुंबले. रत्नागिरी तालुक्यातील मिरजोळे पाटीलवाडी येथे पुलावरून पाणी गेल्याने १६ गावांचा संपर्क तुटला होता. 


दरम्यान, राजापूर शहरातील जवाहर चौक येथील पिकअप शेडपर्यंत पाणी पोहचल्याने काही दुकानदारही धास्तावले होते. गुहागर-भातगाव मार्गावर दरड कोसळल्याने हा मार्ग बंद आहे. तर मुसळधार पावसाने धामणसे ओरी रस्त्यावर रत्नेशवर मंदिर येथे मोरीवरील रस्ता खचल्याने धामणसे ओरी वाहतूक बंद झाली आहे.


गेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी १०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस रत्नागिरी आणि राजापूर तालुक्यांमध्ये पडला असून या दोन्ही तालुक्यांमध्ये यावर्षी पहिल्यांदाच एका दिवसांत २०० मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस पडला आहे.


गेल्या २४ तासांत राजापूरमध्ये २५१ तर रत्नागिरीमध्ये २१२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्याखालोखाल लांजा तालुक्यामध्ये ११७ तर गुहागरमध्ये ११६ तर दापोलीमध्ये १०१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.