अमरावती महापालिका क्षेत्रात कचऱ्याचे ढीग
भयंकर प्रकार आला उघडकीस
राजेश सोनोने, अमरावती : अमरावती महापालिका क्षेत्रात कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी कुठलीही व्यवस्था नसल्याने कचऱ्याचे ढीग साचलेत. कचऱ्याच्या ढिगाऱ्याला आग लावून तो संपवण्यात जात असल्याचा भयंकर प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे अमरावती शहरावर प्रदूषणाचे मोठे संकट ओढावलं आहे.
अमरावती महानगरपालिकेचा कचरा डेपो. पर्यावरण खाते आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रत्येक महानगरपालिका, नगरपालिका यांना आपल्या क्षेत्रातून निघणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावण्याची व्यवस्था करण्याची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. मात्र गेली अनेक वर्षांपासून अमरावती महापालिकेत याबाबत कुठलाही विचार केला गेलेला नाही. केवळ शहरातला कचरा वेगवेगळ्या ठिकाणी गोळा करायचा हा एवढाच कारभार सुरू आहे.
गोळा झालेला कचरा पेटवून देऊन त्याची विल्हेवाट लावली जात आहे. एकीकडे शहरांमध्ये प्रदूषण रोखण्याकरिता अनेक उपाययोजना केल्या जात असताना महापालिका खुलेआमपणे नियमांची पायमल्ली करताना दिसतं आहे. अमरावती महापालिका तर्फे घनकचरा व्यवस्थापन करीता आजपर्यंत कुठलेही ठोस पाऊल उचलले गेले नाही. भविष्यातही असेच दुर्लक्ष झाले तर त्याचे गंभीर परिणाम अमरावती शहरवासीयांना भोगावे लागतील हे मात्र निश्चित.