छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅस लीक! 2 किमीचा परिसर सील; ज्वलनशील वस्तू न वापरण्याचं नागरिकांना आवाहन
Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. भर चौकात गॅसचा टॅंकर उलटल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे.
विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरच्या सिडको चौकात मोठा अपघात झाला आहे. गॅसने भरलेल्या टॅंकरचा अपघात झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन कारवाई सुरु केली आहे. दरम्यान या परिसरातील नागरिकांना देखील प्रशासनाने महत्त्वाच्या सूचना दिल्या असून त्याचे पालन करण्यास सांगितले आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये सिडको चौक भागात एका टँकरचा अपघात झालाय. या टॅंकरमध्ये गॅस असल्याने तो लिक होऊ नये तसेच त्याचा स्फोट होऊ नये म्हणून त्यावर पाणी टाकण्यात येत आहे. घटनेचं गांभीर्य ओळखून जवळपास दोन किलोमीटरचा परिसर पोलिसांनी कॉर्डन ऑफ केला आहे. या परिसरात कुणालाही जाऊ दिले जात नाहीये. तसेच परिसरातील लाईट सुद्धा पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे. हायकोर्टापासून सिडको उड्डाणपुलाच्या पलीकडे चारही बाजूंनी रस्ते पूर्णतः बंद करण्यात आलेले आहेत.
या सोबत प्रशासनाने कोणताही अपघात होऊ नये म्हणून नागरिकांना काही सूचना देखील दिल्या आहे. तसेच परिसरातील वीज पूर्ण बंद करण्यात आली आहे,नागरिकांनी परिसरात येऊ नये घरात राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
नागरिकांसाठी महत्त्वाच्या सूचना :-
एन 3 परिसरात गॅस टँकर उलटला असून त्यातून गॅस गळती होत आहे.
खबरदारीचा उपाय म्हणून सिडको परिसरातील नागरिकांनी घरातील गॅस पेटवू नये.
घरात ज्वलनशील वस्तूचा वापर करू नये.
शहरातील नागरिकांनी जालना रोड सिडको परिसरात वाहने नेऊ नये.
आपत्ती व्यवस्थापन यंत्रणाना सहकार्य करावे.
दरम्यान, तब्बल नऊ तासांपासून संभाजीनगर वर असलेला धोका अखेर टळला आहे. गॅस गळतीला रोखण्यात प्रशासनाला यश आलेला आहे. ज्या टँकरमधून गॅस गळती सुरू होती त्या टँकर मधून तो गॅस दुसरा टँकरमध्ये हलवण्यात आलेला आहे आणि त्यामुळे हा धोका आता टळला आहे. सकाळी गॅस वाहतूक करणारा टँकर हा रस्त्यावरील डिवाइडरला धडकला होता आणि त्यातून मोठ्या प्रमाणात गॅस गळती सुरू झाली होती. त्यामुळे जालना रोड पूर्णतः बंद करण्यात आलेला होता. एक किलोमीटरचा परिसर पूर्णतः निर्मनुष्य सुद्धा करण्यात आला होता. गॅस गळतीमुळे लोकांना त्रास होण्याची भीती होती. मात्र ही भीती आता संपलेली आहे, पुढील तासा दीड तासात परिस्थिती पूर्वपदावर येणार आहे.
नंदुरबारमध्ये एसटी बसला भीषण अपघात
बुधवारी नंदुरबार जिल्ह्यातील कोडाईबारी घाटात नवापूर- पुणे एसटी बसला दुपारच्या सुमारास जबर अपघात झाला. बसने मालवाहू गाडीला मागून धडक दिल्याने हा अपघात झाला. या अपघातात बसमधील 20 ते 22 प्रवाशी जखमी झाले होते. नंदुरबार जिल्यातील नवापूर आगारातून राज्य परिवहन महामंडळाची बस पुण्याकडे निघाली होती. नवापूर बसस्थानकातून सुटलेली बस धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावरून नवापुर, विसरवाडी, चिंचपाडा येथील प्रवासी घेवून जात होती. त्यावेळी कोंडाईबारी घाटात आल्यानंतर उभ्या असलेल्या मालट्रकला मागून जोरदार धडक दिली.