अमरावती : नांदगाव खंडेश्वर नगरपंचायत द्वारे शहरात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात असून आज सकाळी पाणी भरत असतांना नांदगाव शहरातील ओंकारखेडा परिसरातील वार्ड क्रमांक ५ येथील रहिवाशी हरिदास राऊत यांच्या घरी पिण्याच्या पाण्यात नारू सदृश्य जंतू नळातुन आढळून आल्याने एकच खळबळ माजली. त्यामुळे या भागात भितीचे वातावरण निर्माण झाले. ग्रामस्थांनी नगरपंचायत प्रशासनाला याबाबत माहिती दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा नारू सदृश्य जंतू एक ते दीड फुट लांब असून बारीक सुताच्या आकाराचा आहे. नुकतीच कोरोना सारखी आजाराची लागण सुरु असतांना हा नारु नळाच्या पाण्यातून आल्याची भीती ग्रामस्थांत पसरलेली आहे. गावात सर्दी, ताप डोकेदुखी असे आजार मोठ्या प्रमाणात दिसुन येत आहे. 


नांदगाव नगरपंचायतने वॉटर फिल्टरकडे काळजीपूर्वक लक्ष देवून स्वच्छ पाण्याचा पुरवठा शहरवासीयांना करावा, अशी मागणी होत आहे. तसेच आरोग्य विभागाने या पाणीपुरवठा करणार्‍या नळ योजनेकडे लक्ष देण्याची मागणी शहरवासीयांच्यावतीने करण्यात येत आहे. नारू सदृश्य जंतू पाण्यातून निघत असतील तर नगरपंचायतकडून पाण्याचे नियमित साफसफाई होते का, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. 


या घटनेमुळे नांदगावकरांचे आरोग्य धोक्यात असल्याचे दिसून येत आहे. असे पाण्यातून नारू निघणे धोकादायक असून याकडे नांदगाव नगरपंचायतने लक्ष देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन या भागातील नागरिकांनी केले आहे.