श्रीकांत राऊत, झी मीडिया, यवतमाळ : ग्रामीण भागात होळी निमित्त शिमगोत्सव सुरु झाला असून लहान मुलं 'घनमाकड' खेळण्यात दंग झाले आहेत. ग्रामीण भागासोबत यवतमाळच्या शहरी भागातदेखील पुन्हा घनमाकडावर बच्चे कंपनी गोल झोका मारण्याचा आनंद लुटत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लहान मुलांसाठी अत्यंत आनंदाचा सण असलेल्या होळी निमित्त यवतमाळ जिल्ह्यात 'घनमाकड घूम' म्हणत बच्चे कंपनीचीची धूम सुरु आहे. होळी सणानिमित्त लहान मुलांसाठी हा विशेष खेळ असून, घनमाकडावर गोल घुमण्यात बच्चेमंडळी दंग आहे.


धनुष्याच्या आकाराचे आणि एक सरळ खांबासारखे लाकूड आणून घनमाकड तयार करण्यात येते. जमिनीत खड्डा करून त्यात उभा खांब रोवण्यात येतो. त्यानंतर धनुष्याच्या आकाराचे लाकडाला सुताराकडून मधोमध खोल खाच पाडून ते खांबात फसविल्या जाते. खांबात फसविल्यावर धनुष्याच्या आकाराचे लाकूड संतुलीत होते. त्यामुळे त्याच्या दोन्ही बाजूवर बच्चे कंपनी बसून गोल गोल फिरतात. घनमाकड घूम म्हणत लहान मुलं गोल झोक्याचा आनंद लुटतात. 


परस्परातील मतभेद विसरून सौहार्दपूर्ण वातावरण निर्माण करण्याची ऊर्जा देणाऱ्या होळी या सणाच्या अनेक आख्यायिका आहे. त्याचप्रमाणे ग्रामीण भागात विविध परंपरांद्वारे हा सण साजरा करण्यात येतो. त्यातील घनमाकड म्हणजे लहान मुलांची मौज... 


कुठलाही फारसा खर्च नसलेला मात्र धम्माल मस्ती आणि आनंद देणारा हा खेळ ग्रामीण भागात लोकप्रिय असला तरी बदलत्या काळात तो लुप्त होऊ लागला आहे. मात्र काही हौशी मंडळी या खेळाची परंपरा जोपासण्याचादेखील प्रयत्न करीत आहे.