कपिल राऊत, झी २४ तास, ठाणे : पालक सवंग लोकप्रियतेसाठी मुलांना कसं वेठीस धरतात, याचा एक नमुना ठाण्यात पाहायला मिळालाय. जम्मू-काश्मीर संबंधित अनुच्छेद ३७० रद्द केल्याचा आनंदोत्सव म्हणून एका आठ वर्षांच्या मुलीला पालकांनी खाडीपुलावरून उडी मारायला भाग पाडलाय. प्रसिद्धीसाठी पालक काय काय करतात हे या निमित्तानं समोर आलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सवंग प्रसिद्धीची काही लोकांना एवढी चटक असते की ते त्यासाठी काहीही करायला तयार असतात. ठाण्यातल्या ८ वर्षांच्या सई पाटील हिचा कशेळी खाडी पुलावरून उडी मारतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय. 


धक्कादायक बाब म्हणजे पन्नास फुटांवरून उडी मारताना सईचे आईवडील तिच्यासोबत होते. सईनं जेव्हा खाडीपुलावरून उडी मारली तेव्हा खाडीतल्या पाण्यात तिच्या सुरक्षेसाठी कोणतीही साधनं नव्हतं. शिवाय तिथं कोणीही हजर नव्हतं.


पावसाळ्याचे दिवस आहेत खाडीला पाणी आहे. अशा स्थितीत कोणताही दुर्घटना घडली असती तर त्याला जबाबदार कोण राहिलं असतं? लोकसभेत आणि राज्यसभेत बहुमतानं जम्मू-काश्मीरशी निगडीत अनुच्छेद ३७० रद्द झाल्याचा आनंदोत्सव अनोख्या पद्धतीनं साजरा करायचा म्हणून पालकांनीच आठ सईला खाडीपुलावरून उडी मारायला सांगितलं होतं.



खरंतर, अनुच्छेद ३७० काय आहे आणि ते रद्द झाल्यानं कुणाला काय आणि कसा फायदा होणार आहे? हे चिमुरड्या सईला माहितदेखील नाही. तिला जे माहिती नाही त्याचा तिला आनंद कसा होणार? असाही प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळं पालकांनो स्वतःच्या सुप्त इच्छा पूर्ण करण्यासाठी निरागस मुलांचं बालपण वेठीस धरू नका...