मुकुल कुलकर्णी, झी मिडिया नाशिक : नाशिकमधून एक चांगली बातमी. नाशिकमध्ये मुलींचा जन्मदर वाढलाय. एकेकाळी हजारामागे नऊशेवर असलेली मुलींची संख्या आता हजाराला बाराशेवर गेलीय.....  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाशिकच्या रुग्णालयांतली ही बाळं. विशेष म्हणजे मुलींची संख्या मुलांच्या जन्मापेक्षा जास्त आहे. गेल्यावर्षी जिथे हजार मुलांमागे 927 मुलींचा जन्म झाला होता, तिथे आता हजार मुलांमागे बाराशे मुलींचा जन्म झालाय....


नाशिकमध्ये मुलींचा जन्मदर वाढणं याला एक वेगळी पार्श्वभूमी आहे.....याच नाशिकमध्ये गर्भलिंग निदान चाचणी आणि गर्भपात प्रकरणी डॉ. वर्षा लहाडेला अटक झाली होती. मुंबई आग्रा महामार्गावरच्या शिंदे हॉस्पिटलला याच आरोपावरुन सील ठोकण्यात आलं होतं. कित्येक सोनोग्राफी सेंटर्सवर धाडी पडल्या. एकीकडे उमलत्या कळ्या कुस्करल्या जात असतानाच दुसरीकडे मुलींच्या जन्माचं स्वागतही होत होतं.....


गेल्या वर्षी सरासरी १ हजार मुलांमागे मुलींचं प्रमाण ९२१ एवढं होतं.  जानेवारी २०१७ मध्ये 1 हजार मुलांमागे मुलींती संख्या ९४० इतकी झाली. मार्च आणि एप्रिल महिन्यात तर मुलींची संख्या मुलांपेक्षाही पुढे गेली. मार्च महिन्यात एकूण २ हजार ५७ बालकांनी जन्म घेतला. त्यात मुलांची संख्या ९७५ होती तर  मुलींची संख्या होती १ हजार ८२. एप्रिल महिन्यात १ हजार ९६० बालकांनी जन्म घेतला. त्यातली ८९१ मुलं आहेत तर तब्बल १ हजार ६९ मुली.


मुलींचा जन्मदर वाढल्यानं शहरात सकारात्मक वातावरण आहे.  हे वातारण असंच राहण्यासाठी आरोग्य विभागानं सतर्क राहणं गरजेचं आहे.... स्त्री भ्रूण हत्या थांबवण्यासाठी आता सोनोग्राफी सेंटर्स आणि हॉस्पिटल्सना सरप्राईज व्हिजीट दिली जाणार आहे. या कारवाईत सातत्य राहणंही महत्त्वाचं आहे.... पण वर्षा लहाडेमुळे बदनाम झालेल्या नाशिकमध्ये मुलींची संख्या वाढावी हे निश्चितच दिलासादायक.