तीन दिवसात सोन्याच्या भावात १२०० रुपयांची वाढ
गेल्या महिन्यापासून सोन्याचे भाव वाढू लागले आहेत.
विकास भदाणे, झी २४ मीडिया, जळगाव : गेल्या महिन्यापासून सोन्याचे भाव वाढू लागले आहेत. गेल्या तीन दिवसांत तर सोनं बाराशे रुपयांनी महगालं आहे. सोन्याचा भाव प्रतितोळा साडे चौतीस हजारांवर गेला आहे.
पावसाळ्याच्या तोंडावर सोनं तुलनेनं स्वस्त होतं असा तुमचा अनुभव असेल, पण यंदा स्थिती तशी नाही. गेल्या महिन्याभरापासून सोन्याचे दर सातत्यानं वाढू लागले आहेत. भाव वाढल्यानं अनेक ग्राहक खरेदीचा बेत रद्द करून माघारी फिरताना दिसत आहेत.
रुपयाच्या तुलनेत वधारलेला डॉलर, आंतरराष्ट्रीय पातळीवर सक्रिय झालेल्या दलालांमुळे सोन्याचा भाव वधारला आहे. त्यातच महाराष्ट्रात दुष्काळ आहे. सोन्याचे चढ्य़ा भावांमुळे ग्राहकही सराफा बाजारात येत नसल्यानं मंदी गडद झाल्याचं व्यापारी सांगतात.
सोन्याबरोबरच चांदीचे भावही वाढू लागलेत. येत्या काळात सोन्याचे भावही उतरण्याची शक्यता नाही. त्यामुळे ग्राहकांना सोने खरेदी करताना दहावेळा खिसा चाचपून पाहावा लागेल.