मुंबई : राज्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. गेले अनेक दिवस प्रशासकीय अधिकारी पदोन्नती आणि बदल्यांची वाट पाहत होते. याबाबत आता शिंदे सरकारने भूमिका घेतली असून राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारानंतर तसेच पावसाळी अधिवेशनानंतर पोलीस तसंच सामान्य प्रशासन विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या महत्त्वाच्या बदल्या केल्या जाणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाविकास आघाडी सरकार असताना उद्धव ठाकरे यांनी 30 जून पर्यंत बदल्या करू नये असा शासकीय अध्यादेश काढला होता. वास्तविक मे महिन्याच्या अखेरपर्यंत राज्यात सर्वत्र पदोन्नती आणि कार्यकाळ संपलेल्या अधिकाऱ्यांच्या नियमानुसार बदल्या आणि प्रमोशन होत असते.


 मात्र राज्यात राज्यसभा आणि विधान परिषदेची निवडणूक पाहता मुख्यमंत्री तत्कालीन उद्धव ठाकरे यांनी पक्षांतर्गत आमदारांची नाराजी नको यासाठी एक महिना बदल्यांना मुदत वाढ दिली होती. मात्र तीस जून च्या आधीच राज्यात महाविकास आघाडी सरकार जाऊन ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावरून जावे लागलं. त्यानंतर मुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदे यांची वर्णी लागली सरकार जुलैच्या पहिल्या आठवड्यात बहुमत सिद्ध केल्यानंतर देखील अद्याप पर्यंत मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही.


 मंत्रीमंडळ विस्तार रखडल्याने प्रशासकीय बदल्या कधी होणार याचीच चर्चा प्रशासनात आहे. या संदर्भात प्रशासकीय अधिकारी संघटनांचे प्रतिनिधी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच मुख्य सचिव मनू कुमार श्रीवास्तव यांची भेट घेतली. 
 
 या बैठकीनंतर ना राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार आणि पावसाळी अधिवेशन झाल्यावर सर्वसाधारण बदल्या आणि पदोन्नती केल्या जातील असं सूत्रांनी 'झी24तास'ला सांगितले आहे.