धरणांमध्ये मुसळधार, पुणेकरांसाठी आनंदाची बातमी
गेल्या २४ तासांत धरणक्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे.
पुणे : पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणं भरायला सुरूवात झाली आहे. गेल्या २४ तासांत धरणक्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. खडकवासला धरणक्षेत्रात ४० मिमी पाऊस झालाय. त्यामुळे खडकवासला धरण १०० टक्के भरलंय. पानशेत धरणात १५० मिमी पाऊस झालाय. त्यामुळे पानशेत धरण ७४ टक्के भरलंय. वरसगाव धरणक्षेत्रात १४८ मिमी पाऊस झाला आहे.
सलग सुरु असलेल्या पावसामुळे वरसगाव धरण ५९ टक्के भरलंय. टेमघर धरणक्षेत्रात १२२ मिमी पाऊस झालाय. धरणात ५३ टक्के पाणी आहे. सध्या पुण्य़ाला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात ६७ टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे पुण्याची सध्याची पाणी चिंता मिटलीय. नदीपात्रात ५१३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
पाणी गोदावरी पात्रात
नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात गेल्या २४ तासात १७० मिलिमीटर , इगतपुरी तालुक्यात ११४ मिलिमीटर पावसाची नोंद झालीय. दारणा नदी ओसंडून वाहू लागलीय. भावली आणि दारणा धरणातून सुमारे १३ हजार क्युसेक्स वेगाने विसर्ग सोडण्यात आलाय. नांदूर मध्यमेश्वर धरणातून १५ हजार क्सुसेक्स वेगाने पाणी गोदावरी पात्रात सोडण्यात येत आहे. इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यात नद्या, नाले दुथडी भरून वाहत आहेत. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण अद्यापही पूर्ण भरलेलं नाही. मात्र, अद्यापही दहा तालुक्यात पावसानं हजेरी लावलेली नाही.