मुंबई : दररोजच्या धकाधकीच्या जीवनात  प्रवाशांना काहीना काही मनोरंजन पाहिजेच असतं, त्यात मोबाईल हे तुमचं मनोरंजनाचं एकमेव साधन असलं, तरी कधी नेटवर्कमुळे तर कधी slow सर्व्हरमुळे मोबाईल खूपच बफरींग होतो. त्यामुळे व्हीडीओ पाहायला खूप अडथळे येतात. पण आता रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज आहे. तुम्हाला प्रवासात आता अजिबात कंटाळा येणार नाही, कारण याच महिन्यात  रेल्वेची बहुप्रतिक्षित सेवा सुरू होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दीर्घकाळापासून प्रतिक्षेत असलेली कंटेंट ऑन डिमांड (सीओडी) ही सेवा (content on demand in trains) याच महिन्यापासून सुरू होणार आहे. रेल्वे मंत्रालयाकडून  या बद्दलची मंजुरी ही मिळाली आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना आता मनोरंजनासाठी नवीन सुविधा मिळणार आहेत. भारतीय रेल्वेचे पीएसयू रेलटेलच्या (RailTel) एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुरुवारी याबाबत माहिती दिली.


बफर फ्री स्ट्रीमिंग मिळणार
कंटेंट ऑन डिमांड या सेवेअंतर्गत, धावत्या रेल्वे प्रवासात प्रवाशांना त्यांच्या डिव्हाइसवर (मोबाइल किंवा अन्य उपकरण) चित्रपट, बातम्या, म्युझिक व्हिडीओ असे प्रीलोडेड बहुभाषिक (All Language) कंटेट उपलब्ध करुन दिला जाईल. 


विशेष म्हणजे प्रवासात नेटवर्कमुळे स्ट्रीमिंग बफर होऊ नये, यासाठी रेल्वेच्या डब्यात मीडिया सर्व्हर ठेवला जाणार आहे. मीडिया सर्व्हरमुळे प्रवाशांना धावत्या रेल्वेतही आपल्या डिव्हाइसमध्ये हाय क्वालिटी बफर फ्री स्ट्रीमिंगची सेवा मिळेल, असे रेलटेलचे सीएमडी पुनीत पुनावाला यांनी सांगितले आहे.


कुठे होणार सुरू
ही सेवा 5 हजार 723 उपनगरी रेल्वेसह (लोकल) 8 हजार 731 ट्रेन आणि वाय-फाय असणाऱ्या 5 हजार 952 रेल्वे स्थानकांवर सुरू होणार आहे. पश्चिम रेल्वेमार्गावर एका राजधानी एक्सप्रेस आणि एका एसी लोकलमध्ये ही सुविधा अंतिम टप्प्यात असून चाचणी सुरू आहे. यात रेल्वे आणि रेलटेलमध्ये 50-50 टक्के महसूल विभागून घेतला जाणार आहे. पीएसयूला या प्रकल्पातून किमान 60 कोटी रुपयांच्या वार्षिक उत्पन्नाची अपेक्षा आहे.