राज्यभरात अनेक ठिकाणी चांगला पाऊस, धरण पाणीसाठ्यात वाढ
राज्यात अनेक ठिकाणी कालपासूनच चांगला पाऊस झाला आहे.
मुंबई : राज्यात अनेक ठिकाणी कालपासूनच चांगला पाऊस झाला आहे. पावसाची रिपरीप सुरु आहे. शुक्रवारी सकाळपासून कधी जोरदार तर कधी मध्यम स्वरुपाच्या सरी पडत होत्या. मुंबईत अनेक ठिकाणी चांगला पाऊस झाला. तर नवी मुंबईत अधूनमधून पाऊस होता. कोकण पट्ट्यातही अधूनमधून जोरदार पाऊस पडत आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे जिल्ह्यात अधूनमधून पाऊस होता. गेल्या २४ तासात मुंबई शहरात चांगला पाऊस झाला. सततच्या पावसामुळे सातारा जिल्ह्यातल्या कोयना धरणात काल दुपारपर्यंत ८३ पूर्णांक १३ टीएमसी इतका पाणीसाठी झाला होता. यामुळे धरणाच्या पायथा वीज गृहातून एकवीसशे क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु केला आहे.
उत्तर महाराष्ट्रात चांगला पाऊस
धुळे जिल्ह्यात गुरुवारी जोरदार पाऊस झाला. त्यानंतर शुक्रवारी पावसाने काहीशी विश्रांती घेतली. गेल्या २४ तासात धुळे शहर आणि तालुक्यात तालुक्यात ८२ मिलीमीटर, साक्री इथं, २१, शिरपूर तालुक्यात ७९ तर सिंदखेडा तालुक्यात ५८ मिलीमीटर पावसाची झाली. पावसामुळे तापी नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाल्याने नदीकाठच्या गावांना पुढच्या ४८ तासांसाठी सतर्कतेचा इशारा दिला आहे.
जळगाव जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्यानं हतनूर प्रकल्पाचे २४ दरवाजे पूर्ण, तर १२ दरवाजे एक मीटरनं उघडले आहे. धरणातून तापी नदीपात्रात ७५ हजार १२५ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु होता. नदीपात्रात सोडलेलं पाणी धुळे जिल्ह्यातल्या सुलवाडे बॅरेजमध्ये येत असल्यानं या बॅरेजचे ६ दरवाजेही उघडले आहेत. अकोला जिल्ह्यातही चांगला पाऊस झाला. पावसमुळे जिल्ह्यातल्या नद्या - नाले तुडुंब भरून वाहत आहेत.
विदर्भात जोरदार पाऊस
अमरावतीतही जोरदार पाऊस झाला. अमरावतीच्या अनाथाश्रमात जाणारा नाल्यावरचा पूल वाहून गेला आहे. पूल वाहून गेल्यामुळे अनाथाश्रमातल्या २० विद्यार्थ्यांचा शहराशी संपर्क तुटला आहे. एकीकडे कोरोना काळात विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी ऑनलाइन प्रणालीचा वापर करावा लागत आहे. कोरोनामुळे राज्यातील शाळा बंद असल्या, तरी अनाथ विद्यार्थ्यांच्या निवासी अनाथ आश्रम सुरू आहेत.
तसेच पश्चिम विदर्भातील सर्वात मोठा पाणी साठवणूनक प्रकल्प असलेल्या अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरणाचे १३ पैकी ११ दरवाजे ३५ सेंटी मीटर नी आज पहाटे उघडण्यात आले. या धरणातून सध्या ६२० घनमीटर प्रति सेंकद एवढा पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यावर्षी हे धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने अमरावती शहरास इतर भागातील लोकांचा व शेतकऱ्यांचा पाणी प्रश्न मिटला आहे.
गडचिरोली जिल्ह्यात जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. गेल्या २४ तासात सिरोंचा तालुक्यात सर्वाधिक ८५ पूर्णांक २ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पावसामुळे भामरागड तालुक्यातली पर्लकोटा नदी दुथडी भरुन वाहत आहे. भंडारा जिल्ह्यातल्या गोसेखुर्द धरण क्षेत्रातही जोरदार पाऊस झाल्याने धरणाचे २७ दरवाजे १ मीटरनं, तर ६ दरवाजे अर्धा मीटरनं उघडले आहेत. धरणातून ६ हजार ५७१ क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु होता.
अकोला जिल्हयात चांगला पाऊस झाला. अनेक नदी नाले तुडुंब भरून वाहत आहे, अशातच कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयानं नदीकाठच्या ७७ गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. दरम्यान, नांदेड जिल्ह्यातही चांगला पाऊस झाला. मात्र आजपर्यंतच्या अपुऱ्या पावसामुळे जिल्ह्यातल्या अनेक प्रकल्पात अजूनही म्हणावा तसा पाणीसाठा जमा झालेला नाही.