अहमदनगर: तीस वर्षानंतर निवडणुकीला सामोरं जाणाऱ्या आदर्शगाव हिवरेबाजार इथं पोपटराव पवार यांच्या आदर्श गाव पॅनलचा विजय झालाय. सातच्या सात जागांवर आदर्श गाव पॅनलचे उमेदवार निवडून आलेत. त्यामुळे हिवरे बाजार ग्रामपंचायतीवर पोपटराव पवार यांची सत्ता अबाधित राहिली आहे. आगामी काळामध्ये गावातील शेती विकासाबरोबरच कृषी मालाचे मार्केटिंग आणि लघु उद्योग यांच्या विकास करण्याचा अजेंडा असल्याचा पोपट पवार म्हणालेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

30 वर्षानंतर निवडणूक झाली असली तरी निवडणूक पारदर्शी आणि कुठलाही गोंधळ न होता पार पडली. आगामी काळात हिवरे बाजारच्या विकासाचा रथ अखंड सुरू राहील यासाठी प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया पोपट पवार यांनी दिली. 


पोपटराव पवार म्हणाले, 'तीस वर्षांनंतर झालेल्या निवडणुकीत ग्रामस्थांनी विकासाच्या बाजूने कौल दिला आहे. हिरवे बाजारकडे आम्ही फक्त एक गाव म्हणून पाहत नाही. या गावाने अनेकांना योग्य मार्ग दाखवला आहे. ज्या हातांनी हे गाव उभं केलं आहे. ते हात हे गाव चालवण्यासाठी सक्षम असल्याचंही ते म्हणाले. 



पोपटराव पवार यांच्या नेतृत्वाखालील आदर्श ग्राम विकास पॅनलचे उमेदवार पोपटराव पवार, विमल ठाणगे, विठ्ठल ठाणगे, मीना गुंजाळ, सुरेखा पादिर, रोहिदास पादिर, रंजना पवार हे सर्वजण विजयी झाले आहेत.