किरण ताजणे / पुणे : गेल्या काही दिवसांत एका ८५ वर्षीय आजीचा व्हिडिओ समाजमाध्यमांत जोरदार व्हायरल होत आहे. ही आजी काठ्या फिरवतांनाचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामुळे या आजीचे सर्वत्र कौतुक होत असून अनेकांकडून त्या आजीला मदतीचा ओघ सुरू झाला आहे. ही आजी पुण्यातील हडफसर येथील असून तिचा मोठा गोतावळा देखील आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोटाची खळगी भरण्यासाठी एका आजीची अनोखी कसरत सुरू आहे. पुण्याच्या हडपसर परिसरात राहणारी ही आजी डोंबाऱ्याचा खेळ करते. महत्वाचं म्हणजे त्यातही तिचा स्वाभिमान आहे. ती कुणाकडे भिक मागत नाही, तर चित्तथरारक कसरती सादर करून प्रेक्षकांकडून मदतीची अपेक्षा ठेवते. त्यातून मिळणाऱ्या चार दोन रुपयांच्या कमाईवर ती स्वतःचा आणि तिच्यावर अवलंबून असलेल्या पिलावळीचा घर गाडा चालवते. आजीला १७ नातवंडे आहेत आणि त्यांचे तिला शिक्षण करायचे आहे. 


या आजीने दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी हिच्या एका सिनेमातही काम केले आहे.आतापर्यंत आजीने तीन सिनेमात काम केले आहेत. गीता और सीता, शेरणी आणि त्रिदेव या चित्रपटात आजी चमकली आहे. आजीला एकूण १७ नातवंडे आहेत. आजीची मुलं आणि मुली यांची ही मुले आहेत. आजी सांगते, माझे लहानपणी लग्न झाले. त्यामुळे मला शिकता आलेले नाही. मी शिकले नाही, म्हणून माझ्यावर अशी वेळ आली आहे. मात्र, मी माझ्या नातवंडाना शिकविणार आहे. त्यासाठीच मी हे सगळे आवडीने करत आहेत, असे शांताबाई पवार या आजीने सांगितले.


आजीबाईचं कौशल्य आणि कला पाहून थक्क व्हायला होतं. काठ्या फिरवणे, तारेवरची कसरत, थाळीवर चालणं अशा साहसी कला आज्जीबाईना अवगत आहेत.आजी अगदी कोवळ्या वयापासून या खेळाशी जोडल्या गेलेल्या आहेत. पुढे मोठी झाल्यावर त्यांनी त्यालाच आपली रोजी रोटी बनवले. वस्तीतल्या छोट्या छोट्या मुलांनाही त्यांनी हा खेळ शिकवलाय. मुलांना एका टेम्पोत घेऊन पुण्यातही रस्त्यांवर त्या फिरतात. रस्त्यावर, चौकाचौकात खेळ सादर करतात. 


स्वतःचा उदरनिर्वाह चालवण्याबरोबरच ही लोप पावत असलेली कला जोपासण्याचा वसा त्यांनी घेतलाय. सध्या महामारीच्या काळात त्यांच्यावरही उपासमारीची वेळ आलीय. अशा परिस्थितीत त्यांच्यातील जगण्याची जिद्द आणि ऊर्जा कायम आहे. म्हणूनच त्या आजही कसरतीचे खेळ सादर करताहेत. अशा खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर आजीबाईला मनापासून सलाम।