किरण ताजणे, झी मीडिया, नाशिक : ऐन सणासुदीच्या काळात सुकामेवा आणि किराणा महागला आहे. जवळपास १५ ते २० टक्क्यांनी दर वाढले आहेत. दिवाळी... आनंदाचा, उत्सवाचा, उत्साहाचा सण... बाजारपेठेत खरेदीला उधाण आलं आहे. पण यंदाची दिवाळी अनेकांचं दिवाळं काढणार असल्याचं चित्र आहे. कारण बाजारात किराणा मालाबरोबरच सुकामेवा महागलाय. खारीक-खोबऱ्यापासून ते तेल-तुपापर्यंत १५ ते २० टक्क्यांची भाववाढ झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बाजारात काजू ७५० ते ११५० रुपये, बदाम ७२० ते ९५९ रुपये किलो दरानं मिळत आहेत. खारकेचा दर २५० ते ३०० रुपये किलो एवढा आहे. चणाडाळ ६५ ते ७० रुपये, बेसन पीठ ७० ते ७५ रुपये, रवा ४० ते ४३ रुपये किलो आहे. मैदा ४० ते ४५ रुपये, साखर ३६ ते ३८ रुपये किलो, गूळ ४० ते ५० रुपये किलो, भाजके पोहे ६० ते ७० रुपये किलो दरानं मिळतायत. तर तेलाचा ८५ ते ११० रुपये दर आहे. 


काही दिवसांवर दिवाळी येऊन ठेवल्यानं खरेदीला वेग आला आहे. पॅकिंग मालात वाढ झाल्यानं झळ बसणार नाही यासाठी दुकानदाकडून वजनात घट केली जातेय. तर परदेशी चलनात रुपयाच्या तुलनेत तफावत झाल्यानं महागाईवर परिणाम झालाय. त्यामुळे यंदा दुकानदार सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला परवडेल अशा स्वरूपाचे पॅकिंग उपलब्ध करून देत आहेत.


दरम्यान जीएसटीमुळे हे भाव वाढल्याचा अंदाज विक्रेत्यांकडून सांगितला जातोय. त्यामुळे यंदाच्या वर्षी सर्वसामान्यांचं दिवाळं निघण्याची शक्यता आहे.