नागपूर : नोटंबदीनंतर ५६ कोटी करदाते वाढले आहेत. नोटबंदीमुळे जनजागृती झाल्याने हे शक्य झाल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केलाय. नोटबंदीला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली. दरम्यान, पेट्रोल आणि डिझेलवर जीएसटी लावण्याबाबत कधीतरी विचार करावा लागणार असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नोटाबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्त आज भाजपकडून देशभरात ‘काळा पैसा विरोधी दिवस’ साजरा करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर ही पत्रकार परिषद घेतली. कर लावण्यासंदर्भात कुठेतरी लवचिकता असावी आणि राज्याचं उत्पन्न घटलंच तर कुठेतरी भरपाई करता यावी यासाठीच सर्व राज्यांच्या अर्थमंत्र्यांनी पेट्रोल आणि मद्यावर जीएसटी लावण्यास विरोध केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 


तर दुसरीकडे बँकेत आलेल्या काळ्या पैशावर करवसुली सुरु आहे, नोटाबंदीमुळे ‘कॅशलेस इकोनॉमी’कडे वाटचाल सुरु आहे. कॅशलेस व्यवहार हे नोटाबंदीचं यश, असल्याचा दावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला.


मुख्यमंत्र्यांनी नोटाबंदीच्या निर्णयाचे समर्थन केले. नोटाबंदीच्या निर्णयापूर्वी साडेपंधरा लाख कोटी रुपयांची माहिती आपल्याकडे नव्हती. हे पैसे कोणाकडे आहेत आणि त्याचा उपयोग कशाप्रकारे होत आहेत, याची कोणतीही नोंद नव्हती. मात्र, नोटाबंदीमुळे असंघटित अर्थव्यवस्थेतील पैसा संघटित अर्थव्यवस्थेतील बँकिंग क्षेत्रात आला. नोटाबंदीमुळे हे शक्य झाल्याचे ते म्हणालेत. 


नोटबंदीनंतर काळा पैसा सापडल्यास त्याच्यावर करवसुली करणे शक्य होईल, असे फडवणीस यांनी म्हटले. तसेच नोटाबंदीमुळे बेहिशोबी पैसा मोठ्या प्रमाणावर समोर आला. हे पैसे बँक खात्यामध्ये आल्यामुळे त्याचा नेमका स्त्रोत कळाला. त्या आधारे आयकर विभागाने कारवाईला सुरूवात केली, असे ते म्हणालेत.


दरम्यान, नोटबंदीमुळे बेकायदा संपत्ती स्वत:हून उघड करण्याचे प्रमाण ३८ टक्क्यांनी वाढले. तर कारवाई करून पकडण्यात आलेल्या बेहिशोबी रक्कमेचे प्रमाण ४१ टक्क्यांनी वाढले. काळा पैसा शोधून काढण्यासाठी राबवण्यात जप्तीच्या कारवाईत एकूण २९, २१३ कोटी रुपये हाती लागले असल्याचे यावेळी मुख्यमंत्री म्हणालेत.