H3N2 Influenza Virus Death: सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी नागपूर आणि अहमदनगरमधून. राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये H3N2चा नागपुरात संशयित बळी गेल्याचे सांगण्यात आले आहे. (H3N2 Virus) एका 78 वर्षीय रुग्णाचा H3N2 मुळे मृत्यू झाल्याचं पुढे आले आगे. आरोग्य विभागाकडून मात्र यासंदर्भात कुठलीही स्पष्टता झालेली नाही. तर H3N2मुळे महाराष्ट्रात अहमदनगरमध्ये पहिला मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. कोरोनासह H3N2 बाधित हा रुग्ण होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या रुग्णाचे नमुने अधिक तपासणीसाठी पुढे पाठवण्यात आले आहेत. हा रुग्ण एका मेडिकल कॉलेजचा विद्यार्थी असल्याचं समजत आहे. राज्याबाहेर फिरुन आल्यानंतर या रुग्णामध्ये फ्लूची लक्षणं दिसत असल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होते.


हा रुग्ण H3N2 इन्फ्लुएन्झासह कोरोनाबाधित असल्याचा अहवाल रुग्णालयाने दिला होता. तेव्हा या रुग्णाच्या संपर्कातल्या 19 जणांचे नमुनेही तपासणीसाठी पाठवण्यात आले असून आरोग्य यंत्रणा हाय अलर्टवर आलीय. 


दरम्यान, नागपूरमधील या 78 वर्षीय रुग्णाचा एका खासगी रुग्णालयात मृत्यू झाला आहे. या रुग्णाला  क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज’ (सीओपीडी), मधुमेह, उच्चरक्तदाबासारख्या सहव्याधी होत्या.  ‘डेथ ऑडिट’ समितीसमोर हे प्रकरण आल्यावर आणि त्यांनी मान्यता दिल्यावरच या मृत्यूची ‘एच3एन2’ म्हणून नोंद होईल, असे सांगण्यात आले आहे. 


काय आहेत याची लक्षणं, कशी घ्याल काळजी?


खोकला, नाक वाहणे इतकंच नाही तर उच्च ताप येणे, अंग दुखणं, सतत मळमळ, उलट्या किंवा जुलाब होणे, ही लक्षणं H3N2 ची  आहेत. (Symptoms Of H3N2) त्यामुळे ही लक्षणे दिसताच लगेच डॉक्टरांना दाखवणं गरजेचं आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही औषधं घेऊ नये, असा सल्ला देखील तज्ज्ञांनी दिला आहे.


तुम्हाला सर्दी, खोकला, ताप किंवा कोरोनासंबंधी कोणतंही लक्षण (H3N2 Influenza Signs) जाणवत असेल तर अजिबात दुर्लक्ष करु नका. केंद्रानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात गेल्या आठवड्यात 170 रुग्ण आढळले होते. मुंबई, ठाणे आणि पुण्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आल्याची माहिती आरोग्यमंत्री तानाजी सावंतांनी (Tanaji Sawant) दिली होती. आत्तापर्यंत पुण्यात तब्बल 26 रुग्ण आढळून आल्याने पुणेकरांचं (Pune News) टेन्शन वाढले आहे.


सतत खोकला, डोकेदुखी, ताप संबंधित लक्षणे


या आजारामुळे 3-5 दिवस ताप आणि तीन आठवड्यांपर्यंत दीर्घकाळ खोकला आणि सर्दी राहते. H3N2 इन्फ्लूएन्झा उपप्रकारामुळे इतर स्ट्रेनच्या तुलनेत जास्त हॉस्पिटलायझेशन होते आणि लक्षणांमध्ये सतत खोकला, डोकेदुखी, ताप संबंधित लक्षणे यांचा समावेश होतो. हा रोग सामान्यतः असुरक्षित गटांमध्ये सौम्य असला तरी तो गंभीर होऊ शकतो आणि एखाद्याला गुंतागुंत आणि मृत्यूचा धोका देखील असतो. जर एखाद्याला श्वास घेण्यास त्रास होत असेल, रक्तदाब कमी होत असेल, श्वासोच्छवासाचा वेग जास्त असेल, ओठ निळे पडत असतील, फेफरे येत असेल तर ताबडतोब रुग्णालयात जाऊन तपासणी करावी.