H3N2 Influenza Virus : राज्यातील जनतेला एकीकडे हवामान बदलाचा मोठा फटका बसलेला असताना  'एच3एन2' (H3N2) या विषाणूमुळे आणखी टेन्शन वाढलं आहे. राज्यात आतापर्यंत नागपूर (Nagpur) आणि अहमदनगरमधील (ahmednagar) दोन रुग्णांचा आतापर्यंत एच3एन2 मुळे मृत्यू झाला आहे. हे दोन्ही रुग्णांना सहव्याधी असल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली  H3N2 इन्फ्लूएंझा विषाणूच्या प्रसारावर चर्चा करण्यासाठी आढावा बैठक घेण्यात आली. दुसरीकडे राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी एच3एन2 विषाणूच्या फैलावाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"राज्यात एच3एन2 आणि कोविडच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. याबाबत राज्याचे आरोग्य खाते सतर्क असून आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहे. गुरुवारी यासंदर्भात आरोग्य खात्याची बैठक पार पडली आहे. या विषाणूवर कुठेही औषध नाही. त्यामुळे याचे सर्वेक्षण करण्यास सांगितले आहे. तसेच खासगी आणि शासकीय रुग्णालयांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत," अशी माहिती आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिली.


"एच3एन2 विषाणूची लागण झालेल्यांचे विलगीकरण करणे आवश्यक आहे. तसेच राज्यातील वातावरण बिघडत आहे. हवामानात बदल झाल्याने लोकांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी गर्दी कमी करणे, मास्क वापरणे, हाथ धुणे आणि सुरक्षित अंतर पाळणे या सारख्या उपाययोजनांचा अबलंब करावा," असे तानाजी सावंत म्हणाले.


तसेच "काळजी करण्याचं काहीही कारण नसून एच3एन2 विषाणूची लागण झालेल्यांचा आकडा जसा वर जातोय तसा खालीही येईल. फक्त ताप वगैरे आला तर तो अंगावर न काढता तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा," असेही तानाजी सावंत म्हणाले.


एच3एन2 ची लक्षणे कोणती?


एच3एन2 या विषाणूची लागण झाल्यानंतर ताप, खोकला, घसा खवखवणे, धाप लागणे तसेच न्यूमोनियासदृश लक्षणे दिसू लागतात. तसेच 15 ते 20 दिवस राहणारा खोकला हे देखील एच3एन2 या संसर्गाचे महत्त्वाचे लक्षण आहे. मुंबई, पुणे, ठाणे, सांगली, कोल्हापूर, नागपूरमध्ये या लक्षणांचे मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहेत. 16 मार्च रोजी झालेल्या सर्वेक्षणातील आकडेवारीनुसार राज्यात एच1एन1 संसर्गाचे 324, तर एच3एन2 संसर्गाचे 119 रुग्ण आढळले आहेत. तर 73 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. 


एच3एन2 वर उपाय काय?


एच3एन2 मुळे नागरिकांनी घाबरून न जाता वरील प्रकारची कोणतीही लक्षणे आढळल्यास रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावेत. या विषाणूपासून वाचण्यासाठी वारंवार साबणाने व स्वच्छ पाण्याने नियमित हात धुवावेत, मास्कचा वापर करावा, सामाजिक अंतर ठेवावे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, डोळे व नाकाला स्पर्श न करता पौष्टिक आणि योग्य आहार घ्यावा, भरपूर पाणी प्यावे, पुरेशी झोप व विश्रांती घ्यावी अशा सूचना तज्ज्ञांकडून देण्यात आल्या आहेत.