सतीश मोहिते, झी मीडिया, नांदेड : नांदेड जिल्ह्यातील संत्रा बागा गारपिटीमुळे उध्वस्त झाल्या आहेत. शेतक-यांना या बागांवर लाखो रुपये खर्च केला होता. काहींनी विकत पाणी आणून बागा जगवल्या. यंदा फळंही मोठ्या प्रमाणात लागली होती.त्यामुळं शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. मात्र गारपिटीनं शेतकऱ्यांची सगळी स्वप्न धुळीस मिळवली आहेत. तोडणीला आलेल्या बागा जमिनदोस्त झाल्या आहे. रब्बी ज्वारीचीही तीच अवस्था झालीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळं किशोर पोपळे यांची तीन एकरातील संत्र्याची बाग जमिनदोस्त झालीय. बागेमध्ये संत्र्याचा अक्षरश: सडा पडला आहे. झाडावर उरलेला संत्राही विक्रीच्या गुणवत्तेचा राहिली नाही.कारण या संत्र्याला गारींचा मार लागल्यामुळं  तो डागाळला आहे. अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं नांदेड जिल्ह्याला झोडपून काढलं असून त्यातून धानोरा हे गावही सूटलं नाही.


किशोर पोपळे यांची धानोरा गावच्या शिवारात संत्र्याची बाग असून गारपिटीनं त्यांच्या बागेचं प्रचंड नुकसान झालं आहे. खरं तर पाण्याची टंचाई असतानाही पोपळे यांनी ही बाग जगवली होती. त्यांना या फळबागेतून चार लाख रुपयांचं ऊत्पन्न अपेक्षीत होतं. मात्र, सोमवारी आलेल्या आसमानी संकटामुळं त्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरवलंय.


किशोर यांच्याप्रमाणेच माधव पोपळे यांच्या शेतीचं नुकसान झालंय. त्यांनी तीन एकरावर ज्वारी पेरली होती. लवकरचं तिची काढणी केली जाणार होती. मात्र अवकाळी पावसानं घात केला. 


गारपिट आणि अवकाळी पावसामुळे नांदेड, किनवट, माहूर, हदगाव, कंधार या तालुक्यातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामध्ये रब्बी ज्वारी, गहू, हरभरा या पिकांना मोठा फटका बसला आहे. नांदेड तालुक्यातील लिंबगाव, धानोरा, ढोकी, तळणी, वाघी या परिसरातील शेती पुर्णपणे भुईसपाट झाली. 


राज्य सरकारनं हवामान आधारीत विमा तसेच गारपिट आणि नैसर्गिक संकटासाठी विमा असे विम्याचे दोन प्रकार केल्यामुळं शेतकऱ्यांच्या अडचणी वाढणार आहेत.कारण या नियमांमुळं अनेक शेतक-यांना  विमा काढला नाही. दरम्यान जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी कर्मचाऱ्यांसह नुकसान ग्रस्त भागांची पाहणी केली असून पंचनाम्याना सुरुवात केली आहे. आता शेतकऱ्यांचे डोळे राज्य सरकारच्या मदतीकडं लागले आहेत.