खर्च परवडत नसल्यानं बँकांच्या एटीएमची संख्या निम्म्यावर
एटीएम बंद होत असल्यामुळे ग्राहक पुन्हा बँकेच्या जारी...
विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : पैसे काढण्यासाठी तुम्ही आम्ही सर्रास एटीएमचाच वापर करतो. पण आता एटीएमच बंद होऊ लागलेत. बँकांच्या एटीएमची संख्य़ा निम्म्यावर आली आहे. खर्च परवडत नसल्यानं एटीएम बंद होऊ लागले आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा लोकांना बँकांच्या दारी जावं लागणार आहे. लोकांना सहज पैसे काढता यावेत यासाठी एटीएमची व्यवस्था करण्यात आली. गल्लोगल्ली एमटीएम दिसू लागले. पण आता ती परिस्थित कायम राहिलेली नाही. बँकांनी त्यांच्या एटीएमच्या संख्येत कपात करण्यास सुरुवात केली आहे.
खातं असेल त्या बँकेच्या एटीएममधून पाच वेळा विनाशुल्क पैसे काढता येतात. तर दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून तीन वेळा विनाशुल्क पैसे काढता येतात. आरबीआयच्या या नियमांमुळे एटीएममधून बँकांना होणारा फायदा कमी झाला आहे. शिवाय बँकांच्या विलिनिकरणामुळेही अनावश्यक एटीएम बंद करण्यात येत आहेत. एकट्या औरंगाबादचा विचार केल्यास तिथल्या साडेचारशे एटीएमची संख्या अवघ्या निम्म्यावर आली आहे. एटीएमची संख्या कमी झाल्यानं ग्राहकांना पैसे काढण्यासाठी वणवण फिरावं लागतं आहे.
बँकांनी नफ्या तोट्याचा विचार न करता एटीएम सुरु करण्याची मागणी केली जाऊ लागली आहे. एटीएम बंद होऊ लागल्यानं नागरिकांना पैसे काढण्यासाठी बँकेची पायरी चढावी लागणार आहे. त्यामुळं पुन्हा नागरिकांच्या नशिबी बँकेचे हेलपाटे येण्याची शक्यता आहे.