हसन मुश्रीफ आणि जावयाचा पंधराशे कोटींचा घोटाळा, किरिट सोमय्यांनी केला आणखी एक घोटाळा उघड
ठाकरे सरकारच्या मंत्र्यांमध्ये घोटाळे करण्याची कला विकसित असल्याचा टोला सोमय्या यांनी लगावला आहे
कोल्हापूर : भाजप नेते किरिट सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आणखी एका घोटाळ्याचा आरोप केला आहे. हसन मुश्रीफ यांनी स्वत:च्या ग्रामविकास खात्याचं टेंडर स्वत:च्याच जावयाच्या कंपनीला दिलं. ठरवेन ते किंमत असं टेंडर काढण्यात आलं. ज्या कंपनी अस्तित्वात नाही त्या कंपनीतून पैसे आले. अस्तित्वात नसलेल्या कंपनीच्या नावाने फसवणूक करण्यात आली आहे. हसन मुश्रीफ आणि त्यांच्या जावयाने पंधराशे कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे.
हसन मुश्रीफ यांच्या मुलाच्या खात्यात जी कंपनी केव्हाच बंद झाली अशा कंपनीच्या नावाने बँक अकाऊंट उघडण्यात आले. आणि ते मुलाच्या खात्यात आले मुलाने ते साखर कारखान्यात आले. जनतेचा खिसा कापण्याची ही आणखी एक कला असल्याचा टोला सोमय्या यांनी लगावला आहे.
हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबियांविरोदात कोल्हापूरच्या मुरगूड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांना त्याची दखल घ्यावीच लागेल असं सोमय्या यांनी म्हटलं आहे.
ठाकरे सरकारमध्ये घोटाळा करण्याची कला
ठाकरे सरकारची राज्यात घोटाळा करण्याची एक कला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ही कला सुरु केली आहे. घोटाळा करायचे पण वेगवेगळ्या पद्धतीने करायचे. कुठे बेनामी कंपन्या, कुठे शेल कंपन्या, कुठे बंद कंपन्या सुरु करायच्या असा टोला सोमय्या यांनी लगावला आहे. येत्या आठवड्यात आपण राज्यपालांना भेटणार असल्याचं सोमय्या यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, आणखी एका मंत्र्याचे कारनामे आपण उघड करणार असून तो मंत्री विदर्भातला आहे असा इशारा सोमय्या यांनी दिला आहे.