अकोले : कर्मचाऱ्यांच्या संपामुळे महामंडळाचे नुकसान होत आहे हे खरंय. पण, हे नुकसान भरून काढण्यासाठी हजर झालेल्या एसटी कामगारांच्या वेतनात कपात करण्यात येणार नाही. तसा प्रस्ताव झालेला नाही अथवा नियमही केला गेला नाही असे स्पष्टीकरण कालच राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब आणि एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एसटी महामंडळाच्या या स्पष्टीकरणानंतरही अकोले येथील कारंजा आगाराचे व्यवस्थापक मुकुंद न्हावकर यांनी २४ संपकरी कर्मचाऱ्यांविरोधात एक फतवा काढला. आंदोलनात सहभागी झालेल्या जिल्ह्यातील कामगारांविरोधात खातेमार्फत कारवाई सुरु आहे. ही कारवाई करताना संपामुळे आगाराचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.


आगाराचे किमान ७ ते ८ लाख रूपये नुकसान झाले आहे. ही नुकसान भरपाई आपल्याकडून का वसूल करू नये, असा उल्लेख करत व्यवस्थापक मुकुंद न्हावकर यांनी आगारातील २४ संपकरी कर्मचाऱ्यांवर आरोपपत्र दाखल केले. 


संपामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई कामगारांकडून करण्याचा कोणताही निर्णय महामंडळाने घेतलेला नाही, असे असतानाही मनमानी पद्धतीने न्हावकर यांनी पाठविलेल्या या आरोपपत्राची महामंडळाने तातडीने गंभीर दखल घेतली. 


न्हावकर यांच्या या बेजबाबदारपणामुळे संपकरी कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम पसरविणे, गैरसमज निर्माण करणे तसेच संपास चिथावणी देण्याचा हा प्रकार असल्याचा ठपका महामंडळाने न्हावकर यांना पुढील आदेश मिळेपर्यंत सेवेतून निलंबित केले आहे.