वाल्मिक जोशी, झी मीडिया, जळगाव :  जळगाव जिल्ह्यातील भडगावमधील महिंदळे गावात एकाच कुटुंबातील तिघांचा सहा महिन्यात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तिघांच्या मृत्यूचे कारण ऐकून सगळ्यांनाच धक्का बसला आहे.  एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने गावातही धक्का बसला आहे. हृदयविकारानं अर्ध कुटुंब गिळलं असून अवघ्या सहा महिन्यात कुटुंब उद्ध्वस्त झालं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महिंदळे या भडगावातल्या छोट्याशा गावातलं हे घर पोरकं झाल आहे. प्रल्हाद नथ्थू देवरे पाटील यांचं घर.. घरात अठरा विश्व दारिद्र्य... मोलमजुरी करुन देवरे पाटील कुटुंबाचा उदरनिर्वाह चालायचा. आई वडील, पत्नी आणि दोन मुलं असं हे छोटेखानी कुटुंब होतं.  मात्र घरात हृदयविकाराचा राक्षस शिरला आणि अख्खं कुटुंबच उदध्वस्त झालं.



कुटुंबातला पहिला बळी गेला तो  प्रल्हाद यांचे वडील नथ्थू देवरे पाटील यांचा. हृदय विकाराच्या झटक्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.  त्यांच्या मृत्यूला दोन महिनेही होत नाहीत तोच पत्नी संगीताबाई यांचाही हृदयविकारानंच मृत्यू झाला. आता मुलांचा सांभाळ कसा होईल, या विवंचनेत प्रल्हाद देवरे पार खचून गेले. आई जनाबाईंनी त्यांना या दु:खातून सावरण्याचं बळ दिलं. पण नियतीला तेही मान्य नव्हतं. मुलगा आणि नातवांसाठी स्वयंपाक करता करताच या माऊलीला हृदयविकाराचा झटका आला आणि तिचाही दुर्दैवी मृत्यू झाला.


सहा महिन्याच्या काळात एकाच घरातील तीन माणसांचा हृदय विकारानं बळी गेला... या घटनेनंतर गावात हळहळ व्यक्त केली जातेय... एवढ्या मोठ्या दु:खातून सावरण्याचं बळ या कुटुंबाला मिळो, हीच प्रार्थना.