मुंबई : राज्यात आज मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भाला पावसाने झोडपलं आहे. ऑक्टोबर महिन्यात शेतातली पिकं काढणीची वेळ असते. पण याच वेळी पावसाने हाहाकार उडवून दिल्याने, राज्यात शेतकऱ्यांचं बहुतांश ठिकाणी मोठं नुकसान झालं आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे शेतकऱ्यांसाठी आणखी पुढील ३ दिवस हे वैऱ्याचे आहेत. बातमीत खाली पाहा कोणकोणत्या जिल्ह्यात पावसामुळे हाहाकार झाला.


पंढरपूर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंढरपूरमध्ये मुसळधार पावसामुळे कुंभार घाटावरील भिंत कोसळून सहा जणांचा मृत्यू झालाय. या सर्वांचे मृतदेह ढिगाऱ्याखालून काढण्यात आले आहेत. मात्र मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा इशारा कोळी समाजानं दिलाय. निकृष्ट बांधकामाच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्यामुळेच ही दुर्घटना घडल्याचा आरोप तक्रारदार माजी नगरसेवक रमेश कांबळे यांनी केलाय. 


लातूर


लातूर जिल्ह्यातील मुसळधार पावसाचा फटका अंत्यसंस्कार विधीलाही बसला . निलंग्यातील तालुक्यात जोरदार पाऊस आणि स्मशानभूमीसाठी जागाच उपलब्ध नसल्यामुळे मृतदेहावरील अंत्यसंस्कार रखडले . लातूर जिल्ह्यात यावर्षी ११३ टक्के इतका पाऊस झालाय. तर कालपासून निलंगा तालुक्यात ११० मिमी पावसाची नोंद झाली आहे. गावकऱ्यांनी तक्रार न केल्यामुळे माहिती नसल्याचं तहसलीदांनी सांगितल मात्र गटविकास अधिकाऱ्यांना सुचना दिल्याचं सांगितल.


सांगली


सांगली जिल्ह्यात गेल्या १० तासापासून सलग मुसळधार पाऊस कोसळतोय. जोरदार पावसामुळे सांगलीतील जनजीवन विस्कळीत झालंय. सांगलीच्या स्टेशन रोड, मारुती रोड , मेनरोड तसेच अनेक प्रमुख मार्गावर पावसाचं पाणी आल्यानं रस्ते जलमय झालेत. याच बरोबर जिल्ह्यात अनेक ओढे ,नाले आणि छोटे पूल सुद्धा पावसाच्या पाण्याने भरून वाहतायत. सांगली जिल्ह्याच्या पूर्व भागात पूर सदृश्य परिस्थती निर्माण झालीय.


बीड


बीडमध्ये अनपटवाडी गावाच्या शेजारून मांजरा नदी दुथडी भरून वाहतेय. मात्र नदीवर पूल नसल्याने नागरिकांना अक्षरशः मृत्यूला हुलकावणी देऊन प्रवास करावा लागतोय. हा जीवघेणा प्रवास या गावकऱ्यांसाठी नित्याचाच झालाय. तब्बल सहाशे मीटर एकमेकांच्या साहाय्याने वाहत यावे लागतेय. प्रशासनाने नदीवर निदान एक पूल तरी बांधून द्यावा अशी मागणी ग्रामस्थ करतायेत.


उस्मानाबाद


सलग पडत असलेल्या पावसामुळे तुळजा भवानीच्या मंदिरात पावसाचे पाणी शिरलंय. त्यातच तुळजा भवानी मंदिराच्या जिजाऊ महाद्वार समोरील गटार तुंबल्याने पावसाचे पाणी तुळजा भवानी मंदिरात घुसले. नगर परिषद प्रशासनाने तात्काळ कर्मचारी पाठवुन महाद्वार समोरील तुंबलेली गटार व्यवस्थित करण्याचं काम सुरुय. मात्र बाहेरून येणाऱ्या पाण्यामुळे मंदिरात मोठ्याप्रमाणात पाणी आले आहे. प्रवेशद्वारावर तर गुडघाभर पाणी साचले आहे. 


अहमदनगर


अहमदनगर येथे जामखेड तालुक्यातील दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. चोंडी येथील 22 वर्षीय तुषार सोनवणे आणि 43 वर्षीय सतिष सोनवणे हे दोघे चुलता पुतणे सिना नदीवरील बंधाऱ्यात मासे पकडण्यासाठी गेले होते पाण्याचा अंदाज न आल्याने आणि पाण्याचा वेग जास्त असल्याने पाण्यात बुडाले. प्रशासनाच्या तब्बल 6 तासाच्या अथक प्रयत्नाने रात्री दोन्ही मृतदेह शोधण्यात यश आलं.


उस्मानाबाद


मागील काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील नद्या, नाले ओसंडून वाहत आहे. याचदरम्यान पर्यटकांचं आकर्षण असणाऱ्या आणि ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील नरमादी धबधबा खळाळून वाहत आहे. त्यामुळे विलोभनीय असे चित्र निर्माण झाले आहे. तर रात्रभर पडलेल्या पावसाने नळदुर्ग किल्ल्यातील नर मादी धबधब्यावरून पाणी जात आहे. या पाण्याने रौद्ररूप धारण केल्याचं पाहायला मिळत आहे.