पुणे : मान्सूच्या आगमनाची सर्वजण वाट पाहत आहेत. दरम्यान, उद्या दि. १२ जून रोजी कोकण, गोव्यात धुवाधार पाऊस पडेल, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे. दरम्यान, पावसासह जोरदार वारा असेल त्यामुळे मासेमारी करण्यासाठी कोणीही समुद्रात जाऊ नये, असा धोक्याचा इशारा वेधशाळेने दिला आहे. मान्सून हा १४ तारखेनंतर राज्यात सक्रीय होण्याची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल वातावरण असेल, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. 


'वायू' चक्रीवादळ शमल्यानंतर मान्सून सक्रीय होईल


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१२ जूनला कोकण आणि गोव्यात धुवाधार पावसाचा अंदाज आहे. मुंबईतही हीच स्थिती असेल. १२ जूनला कोकण, गोवा परिसरात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुसळधार पाऊस कोसळणार असल्याने प्रत्येकांना खबरदारी घ्यावी. तसेच मासेमारी करण्यासाठी १२ जूनला समुद्रात जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, 'वायू' वादळामुळे मान्सूनची प्रगती थांबली आहे. 



१२ जूनला महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर वाऱ्याचा वेग ताशी ७० किमीपर्यंत असेल. तसेच वाऱ्याच्या वेगात वाढ होणार असून ताशी १२० ते १३५ किमीच्या वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. गुजरातच्या किनारपट्टीवर वाऱ्याचा वेग ताशी १३५ किमीपर्यंत असेल. येत्या चोवीस तासात ते आणखी तीव्र होणार आहे.


हे वादळ गुजरात किनारपट्टीच्या दिशेने जाणार असल्यामुळे राज्यात हे वादळ धडकण्याची शक्यता नाही, परंतु त्याच्या प्रभावामुळे येत्या दोन दिवसात वाऱ्याचा वेग वाढणार आहे. तसेच किनारपट्टीच्या भागात व्यापक परिसरात जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे मासेमारी करण्यासाठी समुद्रात जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.



'वायू' हे वादळ १३ जूनला धडकेल असा अंदाज आहे. सौराष्ट्र आणि कच्छमध्ये १३ जूनला 'रेड अलर्ट' जारी करण्यात आला आहे. 'वायू' वादळामुळे मान्सूनची प्रगती थांबल्याने पाऊस केरळच्या पुढे सरकलेला नाही. १४ तरखेनंतरच मान्सून पुढे सरकेल. महाराष्ट्रमध्ये मात्र पाऊस पडेल. हा पाऊस मान्सूनचा नसला तरीही 'वायू' वादळाच्या प्रभावामुळे संपूर्ण महाराष्ट्रात १३ तारखेपर्यंत पाऊस पडण्याचा अंदाज, पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.