'वायू' चक्रीवादळ शमल्यानंतर मान्सून वेगाने सक्रीय होणार

वायू चक्रीवादळामुळे राज्यात मान्सूनला काहीसा उशीर होणार आहे.

Updated: Jun 11, 2019, 05:53 PM IST
'वायू' चक्रीवादळ शमल्यानंतर मान्सून वेगाने सक्रीय होणार  title=

सुस्मिता भदाणे, झी मीडिया, मुंबई : 'वायू' हे चक्रीवादळ पुढील २४ तासांच्या आत अरबी समुद्रात वेगाने सक्रीय होणार आहे. मुंबईला 'वायू' चक्रीवादळाचा धोका नसला, तरी मुंबईत आणखी पावसाची शक्यताय. मात्र सर्वात महत्वाची बाब म्हणजे, 'वायू' चक्रीवादळ शमल्यानंतरच, मान्सून वेगाने सक्रीय होणार आहे.

वायू चक्रीवादळामुळे राज्यात मान्सूनला काहीसा उशीर होणार आहे, यामुळे पेरणी करण्याची घाई करू नये, प्रत्यक्ष मान्सून आल्यानंतर पेरणीचा विचार करावा, असं हवामान खात्यानं म्हटलंय. तर या दरम्यान विदर्भ-मराठवाड्यात आणि मध्य-महाराष्ट्रात उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय.

सध्या नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचे (मॉन्सून) प्रवाह कमजोर आहेत. चक्रीवादळ शमल्यानंतर, मान्सूनचे वेगाने प्रगती करणार आहे. यातच अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाब क्षेत्राच्या प्रभावामुळे, वादळ गेल्यानंतर मॉन्सून वेगाने प्रगती करत १३ जूनपर्यंत कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात दाखल होणार आहे. मॉन्सूनच्या आगमनात राज्यात ३ ते ४ दिवसांची तफावत शक्य आहे. मात्र विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये मॉन्सूनचे आगमन लांबण्याची शक्यताय.

तर दुसरीकडे गुजरातमधील सौराष्ट्र किनाऱ्य़ाला सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. वादळामुळे अहमदाबाद, गांधीनगर आणि राजकोटसह अन्य किनारी परिसर म्हणजेच वेरावल, भूज आणि सुरतमध्येही हलक्या पावसाच्या सरींची हजेरी असणार आहे. अरबी समुद्र किनाऱ्यालगत असणाऱ्या भागात ११५ किमी ताशी वेगाने वारे वाहणार असल्याची शक्यता असल्याचं हवामान खात्यानं म्हटलंय.