शशिकांत पाटील, झी मीडिया, लातूर : लातूर जिल्ह्यात परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली आहे. या पावसाने नदी-नाले-ओढे-तलाव भरभरून वाहत आहेत. जळकोट तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. जवळपास १६७ मिमी इतक्या पावसाची नोंद जळकोट तालुक्यात झाली आहे. त्यामुळे जळकोट तालुक्यातील तिरु नदीला पूर आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या पुराचे पाणी रस्त्यावरून वाहू लागल्यामुळे उदगीर-पिंपरी-नळगीर-घोणसी-अतनूर-बाराहाळ्ळी मार्गावरची वाहतूक ठप्प झाली होती. तसेच जवळपास १२ गावांचा संपर्कही तुटला होता. तर जळकोट तालुक्यातीलच मंगरुळ येथील ओढ्याला पूर आला होता. परिणामी पुराचे गावातील रस्त्यावरून वाहू लागले होते. 


 


अनेक घरात पुराचे पाणी शिरल्यामुळे ग्रामस्थांची मोठी तारांबळ उडाली. या पुरामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण होते. त्यामुळे सकाळी तीन तास मतदानच होऊ शकले नाही. सकाळी १० नंतर पाऊस थांबल्यानंतर हळूहळू पुराचे पाणी ओसरु लागल्याने परिस्थिती पूर्वपदावर आली. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे.