राज्याला पावसाने झोडपले तर मुंबईत रात्रभर जोरदार पाऊस, पुढील 48 तासात जोर वाढणार
राज्याच पावसाचा जोर वाढला आहे. तर कोकणमध्ये मुसळधार कोसळत आहे. तर मुंबईत रात्रभर जोरदार पाऊस सुरु आहे. मुंबई शहरात सखल भागात पाणी साचले आहे.
मुंबई : राज्याच पावसाचा जोर वाढला आहे. (Heavy Rain in Maharashtra ) तर कोकणमधील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून मुसळधार कोसळत आहे. त्यामुळे काही ठिकाणी नद्यांना पूर आला आहे. तर मुंबईत रात्रभर जोरदार पाऊस सुरु आहे. (Heavy rains in Mumbai) मुंबई शहरात सखल भागात पाणी साचले आहे. असाच पावसाचा जोर कायम राहिला तर पुन्हा पाणी साचून वाहतूक कोंडी निर्माण होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकड मुंबई उपनगरांमध्येही पावसाची संततधार दिसून येत आहे. दरम्यान, पुढील 48 तास जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. (The meteorological department has forecast heavy rains in Maharashtra for the next 48 hours.)
मुंबई शहर उपनगरात रात्रीपासून संततधार पाऊस होत असून सखल भागात पाणी साचण्यास सुरूवात झाली आहे. कुर्ला, दादर परिसरात जोरदार पाऊस आहे. सायनचे गांधीमार्केट जलमय झाले आहे. तसेच सायनमध्ये पाणी साचले आहे. पाण्यातून मार्ग काढताना वाहनचालकांना कसरत करावी लागतेय. वडाळा परिसरातही पाणी साचले आहे. सध्या तरी वाहतूक सुरू आहे. मात्र पावसाचा जोर असाच सुरू राहिला तर वाहतूक ठप्प होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
जळगावात मुसळधार पावसात नाल्याला अचानक आलेल्या पुरात एक बैलगाडी वाहून गेली. यात बैलांचा मृत्यू झाला तर शेतकरी पुराच्या पाण्यात वाहून गेलाय. शेतकऱ्याच्या पत्नीला वाचवण्यात यश आले आहे. जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात निमभोरा गावात ही घटना घडली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचे धुमशान सुरु आहे. निर्मला नदीला पूर आल्याने 27 गावांचा संपूर्ण तुटला आहे. दोडामार्गच्या तिलारी खोऱ्यातील अनेक कॉजवे पाण्याखाली गेलेत. पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
सिंधुदुर्गात गेले चार दिवस बरसणाऱ्या पावसाने मसुरे पंचक्रोशीत जनजीवन विस्कळीत झाले. रमाई नदीची पाण्याची पातळी वाढल्यानं मालवण बेळणे कणकवली मार्गावरील बागायत इथे पुराचे पाणी थेट बागायत तिठा इथल्या बाजारपेठेजवळ पोहचले. वडाचापाट गोळवण मार्गावर वडाचापाट इथे तर पोईप धरणावर पाणी असल्यानं हा मार्ग सुद्धा वाहतुकीस बंद झाला आहे.
कोकणातील एक स्टंट दोन युवकांच्या चांगलाच अंगाशी आली. पुलावरून पाणी वाहत असतानाही या युवकांनी पाण्यामध्ये गाडी टाकण्याचं धाडस केलं. अर्ध्या रस्त्यातच दोघेही बाईकवरून खाली पडले. ग्रामस्थांनी या दोघांनाही वाचवलंय. कुडाळ तालुक्यातील साळगाव इथं हा प्रकार घडलाय. ग्रामस्थांच्या जागरुकतेमुळे मोठा अनर्थ टळलाय. तुम्ही मात्र असलं धाडस करू नका, ते जीवघेणं ठरू शकते.
रत्नागिरीतील गुहागरमध्ये मुसळधार पाऊस बरसला. यामुळे शृंगारतळी भागात पावसाचं पाणी थेट नागरिकांच्या घरात शिरले. तुंबलेली गटारं, रस्त्याची अर्धवट कामं यामुळे घरात पाणी शिरल्याचे नागरिकांनी सांगितलं. रात्रीच्या वेळी घरात पाणी घुसून दुर्घटना झाल्यास जबाबदार कोण ? असा संतप्त सवाल राहिवाशांनी विचारला आहे.