योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : नाशिकचे गंगापूर धरण 90 टक्के भरल्यामुळे विसर्ग 12 हजार क्यूसेकने वाढवून 36 हजारापर्यंत नेण्यात आला आहे. होळकर पुलाखालून साठ हजार क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. शहराला जोडणारे सर्व पुलांवरून पाणी वाहत असल्याने सिडको, वडाळा, इंदिरानगर, पंचवटी आदी उपनगरांचा शहराशी संपर्क तुटला. दुतोंडया मारुती बुडाला असून नारोशंकरच्या घंटेला पाणी लागले आहे. सरकार वाड्याच्या तिसऱ्या पायरीपर्यंत पाणी पोहोचले आहे. महापुराचा धोका दिसतोय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रेल्वे वाहतूकही विस्कळीत झाली असून कसारा आणि इगतपुरी रेल्वे स्थानकांवर दुरांतो आणि मंगला एक्सप्रेस अडकून पडलेल्या आहेत. राज्यराणी, सेवाग्राम, गोदावरी एक्सप्रेस रद्द करण्यात आली असून सकाळी इगतपुरीपर्यंत गेलेली पंचवटी एक्सप्रेस आता पुन्हा मनमाडकडे परत पाठविण्यात येत आहे.


मुंबई महामार्गवर पाणी साचल्याने वाहतूक काही ठिकाणी थांबविण्यात आली आहे. पेठ सुरगाणा या आदिवासी पट्ट्यातही विक्रमी पाऊस सुरू असल्याने तेथील खेड्यापाड्यांचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे. सर्व नद्या नाले ओसंडून वाहत आहेत, त्यामुळे रस्ते जागोजागी बंद झाले आहेत.



सोमेश्वर, त्रंबकेश्वर येथील दुगारवाडी, इगतपुरी येथील भावली धबधबा परिसरात पर्यटकांना बंदी.  पाहिने, पेगलवाडी नेकलेस धबधबा परिसर देखील वनविभागाने निर्मनुष्य केला आहे. कृपया नाशिककरांनी घराबाहेर पडण्याचा धोका स्वीकारू नये तसेच अन्य ठिकाणच्या बांधवानी यांचे नाशिक किंवा मुंबईकडे प्रवासाचे नियोजन असल्यास ते रद्द करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. कुणीही गोदाकाठी आणि आजूबाजूला असलेल्या नदी-नाल्यांच्या काठी जाऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे.