मुंबई : राज्यात परतीच्या पावसाने चांगलेच थैमान घातले आहे. दिवाळी अगदी काही दिवसांवर येवून ठेपली आहे. त्यामुळे सण साजरा करायचा कसा असा प्रश्न सर्वांना पडला आहे. तर सातारा - सांगलीत नद्या दुथडी भरून वाहत आहेत. शिवाय नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आला आहे. सातारा - सांगली शिवाय पुण्यात परतीच्या पावसानं दमदार हजेरी लावली आहे. त्याचप्रमाणे मुंबईत सुद्धा गेल्या दोन दिवसांपासून पवसाची रिमझीम सूरू आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सांगली जिल्ह्यात पडलेल्या जोरदार पावसामुळे पश्चिम भागातील कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली. आटपाडी, कवठेमहांकाळ, जत या दुष्काळी तालुक्यातील नद्यांनाही पूर आलाय. 


दुष्काळी भागातील अनेक गावातील नाले, ओढे ओसंडून वाहू लागलेत. आटपाडी तालुक्यातील तलाव १४ वर्षांनंतर पहिल्यांदा भरला. पुरामुळे भात, ऊस, सोयाबीन, भुईमूग या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. 


दुष्काळी माण तालुक्यात मोठ्या प्रमाण परतीचा पाऊस झाला. त्यामुळे या भागातील माणगंगा नदीला मोठा पूर आलाय. या पावसामुळे आंधळी धरण देखील ओव्हरफ्लो झालंय. तब्बल दहा वर्षांनंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानं आणि माणगंगा नदी दुथडी भरून वाहत असल्यानं या भागातील लोकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.