अकोला : विदर्भातल्या अकोला, वर्धा आणि भंडारा जिल्ह्याला जोरदार पावसानं झोडपलं आहे. अकोल्यात ब-याच दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसानं हजेरी लावली. कालपासून बरसलेल्या पावसानं जिल्ह्यातल्या जलाशय साठ्यात वाढ होतेय. तसंच बळीराजाला दिलासा मिळालाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अकोला जिल्ह्यातील तेल्हारा, पातुर, बार्शीटाकळी, बाळापूर, मुर्तिजापूर इथं 100 मीमी हून अधिक पाऊस पडल्याने 70 % पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. काल बरसलेल्या या पावसामुळे जिल्ह्यातील उर्वरित पेरण्या आता पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. वर्धा जिल्ह्यातही अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पावसानं हजेरी लावली. जिल्ह्याच्या वर्धा, हिंगणघाट, आर्वी, आष्टी तालुक्यात चांगला पाऊस झालाय.


तर गोंदिया जिल्ह्यात झालेल्या पावसानं जिल्ह्यातल्या अनेक गावात मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय. मोरगाव अर्जुनी तालुक्यात अतिवृष्टी झाली आणि पुलावर पाणी साचलं तर तालुक्याशी जोडणा-या दोन गावांचा संपर्क तुटला. अनेक झाडांची पडझडही झाली. नागरिकांना सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात आलाय.


गडचिरोली जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडत असल्याने जिल्ह्याच्या बहुतांश भागात पूरस्थिती निर्माण झालीय. पर्लकोटा नदीला पूर आलाय. पूराचे पाणी भामरागड तालुक्याच्या गावात शिरल्याने बाजारपेठ आणि अनेक घरं पाण्याआखील आलीत. पुरामुळे शंभर गावांचा संपर्क तुटलाय. देसाईगंज शहरानजीक मासेमारीसाठी गेलेल्या एका इसमाचा पूरात वाहून गेल्यानं मृत्यू झालाय.


अतिवृष्टीमुळे चामोर्शी तालुक्यातील सोनापूर इथल्या तलावाची पाळ फुटली. यामुळे तलावाचे पाणी शेतात घुसल्याने शेतीपिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. तसंच यामुळे नागरी वसाहतीमध्ये पाणी घुसल्याने प्रशासनाकडून मदत आणि बचावकार्य सुरु करण्यात आलंय. येत्या काही दिवसांत जिल्ह्यात आणखी काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा वेधशाळेने दिलाय.