गडचिरोली: सततच्या पावसानं गडचिरोलीमध्ये पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. गेल्या २४ तासांत जिल्हयात ७० मिमी पाऊस झाला. त्यामुळं अनेक जिल्हामार्ग बंद झालेत. अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेता प्रशासनानं शाळांना सुट्टी दिलीय. दक्षिण भागात पावसाचा जोर वाढलाय. नद्यांच्या पातळीत वाढ झालीय. भामरागडचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटलाय. तर, शहरातली पाणी निचऱ्याची व्यवस्थाही पुरती कोलमडलीय. नगरपरिषदेची इमारतही पाण्यानं वेढली असून, कठाणी नदीच्या पातळीत वाढ झाल्यानं बामणी-कठाणी मार्ग बंद झालाय.


कर्तव्यदक्ष प्रशासनाची समयसूचक कर्तव्यदक्षता


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गडचिरोलीत प्रशासनाने पूर परिस्थितीत अनोखी संवेदनशीलता दाखविली आहे. भामरागड तालुका मुख्यालयातील प्राथमिक आरोग्य केंद्रात 'झारेगुडा' गावातील 'शांती मडावी' नामक महिलेने बाळाला जन्म दिला. चार दिवस बाळ आणि बाळंतिणीवर वैद्यकीय उपचार केल्यानंतर तिला सुटी देण्यात आली. मात्र काल रात्री पासून भामरागड तालुक्यात जोरदार पाऊस झाल्याने संपूर्ण भागात पूर परिस्थिती निर्माण झाली आणि जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला. भामरागडचे उपविभागीय पोलीस अधिकारी  तानाजी बर्डे आणि तहसीलदार कैलास अंडील,  ठाणेदार सुरेश मदने यांना ही बातमी कळली. त्यांनी आपत्ती विभागाची रेस्क्यू बोट आणून शांती आणि बाळाला तिच्या गावापर्यत सुखरूप पोहोचवीत अनोखी संवेदनशीलता दाखविली. या घटनेने शांती मडावी आणि तिच्या बाळाला प्रशासनातले देवदूतच मिळाले.


जिल्ह्यात ५९७ मिमी पावसाची नोंद


दरम्यान,  जिल्ह्यात जुन आणि जुलै मिळून जिल्ह्यात ५९७ मिमी पावसाची नोंद झालीय.