अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : शनिवारी सायंकाळी अमरावती जिल्ह्यातील वरुड आणि तिवसा तालुक्याला वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने झोडपून काढलं. या पावसामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. तिवसा तालुक्यातील अनेक गावातील कपाशी, संत्रा पीक पूर्णपणे जमिनीवर आली आहेत. संत्रा उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या वरुड तालुक्याला देखील याचा फटका बसल्याने लाखो रुपयांची संत्री जमिनिवर गळून पडली आहेत. तर अनेक शेकडो संत्रा झाडे कोसळल्याने पुन्हा एकदा शेतकरी अडचणीत सापडला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या सोयाबीन पीक सोगण्याच्या मार्गावर असून कपाशी चांगल्या प्रकारे आहे. तर संत्राचा आंबिया बहार असून झाडाला चांगली संत्री आहेत. मात्र गेल्या काही दिवसापासून तालुक्यात रोज पाऊस होत आहे. त्यामुळे या पिकांचं नुकसान होत आहे .शनिवारी सायंकाळी तिवसा तालुक्यातील वरखेड, उंबरखेड, धामत्री या काही भागात मोठ्याप्रमाणात वादळी वाऱ्यासह पाऊस आल्याने मोठं नुकसान झाल्याचं चित्र होतं. 


उंबरखेड येथील नरेंद्र कळंबे यांच्या 7 एकरातील बगीच्यामध्ये संत्र्याची झाडे असून त्यावर चांगला बहार आला आहे. मात्र काल अचानक झालेल्या पावसामुळे त्यांच्या बगीच्यातील काही झाडे तुटून पडली तर वाऱ्यामुळे संत्रीदेखील गळून पडली आहेत. सोबतच पराटी झोपली आहे. या भागातील शेतीचं मोठं नुकसान झालं असून शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईची मागणी होत आहे.