राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, पुढील 5 दिवसांत जोर वाढणार
Heavy rains expected in Maharashtra : राज्याच्या अनेक भागात आजपासून मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तसेच येत्या पाच दिवसांत राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
मुंबई : Heavy rains expected in Maharashtra : राज्याच्या अनेक भागात आजपासून मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तसेच येत्या पाच दिवसांत राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाण्यातही रविवारपासून मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुढील दोन दिवस राज्यातील विविध भागांत वादळी वाऱ्याचीही शक्यता आहे. त्यानंतरच्या 3 दिवसांपासून कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.
राज्यात कुठे पाऊस पडणार ?
काही दिवस पावसाने दडी मारली होती. आता पुन्हा मान्सून सक्रिय झाला आहे. मोसमी पावसासाठी पोषक वातावरण असून कोकण विभागात पावसाने चांगली हजेरी लावली आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील घाट विभागांतही पाऊस जोर धरणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आदी भागांतही मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली आणि पुणे जिल्ह्यांतील घाट विभागातही काही प्रमाणात पावसाची शक्यता आहे.
सध्या कोकण विभागात हलक्या पावसाला सुरुवात झाली असून, दोन दिवसांत त्याचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मराठवाडा, विदर्भात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरींचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
कोकणात मुसळधार कोसळणार !
सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातील काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. अरबी समुद्राच्या बाजूने मोसमी पावसाची गुजरातपर्यंत प्रगती झाली आहे. मध्य महाराष्ट्र आणि संपूर्ण मराठवाडा ओलांडून मोसमी पाऊस विदर्भातील बहुतांश भागांत दाखल झाला. जवळपास 99 टक्के महाराष्ट्र मोसमी पावसाने व्यापला आहे. मात्र, म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. अरबी समुद्रातून सध्या बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रवास वाढत आहे. दोन दिवसांत त्यांचा वेग वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या किनारपट्टीच्या भागात चक्रिय वाऱ्यांची स्थिती तयार होत आहे. ही स्थिती लक्षात घेता पुढील दोन दिवसांत दक्षिण कोकणात सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातील काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे.