कोल्हापूर : जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलंडण्यास सुरुवात केली आहे. धोक्याची पातळी गाठण्यासाठी पंचगंगेला केवळ दोन फूट बाकी आहे. पंचगंगा नदीची पाणीपातळी ४१ फूट २ इंचावर आहे.  जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून कोल्हापूर जिल्ह्यातील १०२ बंधारे पाण्याखाली आहेत. तर राधानगरी धरणाचे स्वयंचलीत दरवाजे कोणत्याही क्षणी उघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोल्हापुरात पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेऊन एनडीआरएफच्या दोन तुकड्या रवाना करण्यात आल्या आहेत. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परिसरात दिवसभरात सूरु असलेल्या जोरदार पावसामुळे खबरदारीचा उपाय म्हणून राष्ट्रीय आपत्ती पुनर्वसन दलाच्या दोन तुकड्या कोल्हापूरसाठी रवाना करण्यात आल्या आहेत,अशी माहिती आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली. कोल्हापूरमधील पावसाची स्थिती लक्षात घेऊन राज्यमंत्री डॉ. पाटील यांनी मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर यांच्या समवेत बैठक घेतली.



यावेळी एनडीआरएफच्या दोन तुकड्या कोल्हापूरला पाठविण्या बाबत मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी देखील कोल्हापूरसाठी तत्काळ तुकड्या रवाना करण्याचे निर्देश दिल्याचे राज्यमंत्री डॉ. पाटील यांनी सांगितले.


जिल्ह्यातील नदी काठच्या गावातील लोकांचं स्थलांतर करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या आवाहनानंतर ग्रामस्थांनी स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. चिखली गावातील ग्रामस्थांनी प्रत्यक्षात स्थलांतराला सुरुवात केली आहे. दौलत देसाई यांनी चिखली गावात पोहोचून ग्रामस्थांना स्थलांतर करण्याची विनंती होती. कोल्हापूर जिल्ह्यात अनेक गावांमध्ये दवंडी पिटून नदीकाठच्या ग्रामस्थांना स्थलांतर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.