मुंबई : राज्यात उत्तर पुणे, परभणी, औरंगाबाद, हिंगोली या ठिकाणी जोरदार पाऊस झाला. काही ठिकाणी नद्यांना पूर आल्याने गावात पाणी शिरले. तर काही ठिकाणी शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, राज्याच्या काही भागांमध्ये शुक्रवारपासून मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. येत्या २४ तासांत कोकण, गोवा,  मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर शुक्रवारपासून कोकण, मराठवाडय़ात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात अनेक ठिकाणी मुसळधार, तर काही ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.


पुणे । दोन दिवस मुसळधार पाऊस


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तर पुणे जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पाऊस पडत असून जुन्नर तालुक्याच्या बेल्हें इथे  एका ६० वर्षीय कोरोना संशयीत महिलेचा मृत्यू झाल्यानंतर या महिलेचा अंत्यसंस्कार विधी साचलेल्या पाण्यातच उरकण्यात आला....कोरोनाबाधित महिला असल्याने महिलेच्या मुलाच्या मदतीसाठी कोणीही येत नव्हतं मात्र भर पावसात गावातील गोट्याभाऊ वाघ,स्वप्नील भंडारी व अशोक कवडे हे तरूण धावून आले आणि माणुसकी दाखवत स्मशानभूमीत गुडघाभर पुराचं पाणी भरलेलं असताना महिलेचा अंत्यविधी पार पडला.


औरंगाबाद । अक्षरशः ढगफुटी सारखा पाऊस  


औरंगाबाद जिल्ह्यामध्ये रात्री अक्षरशः ढगफुटी सारखा पाऊस झाला. या पावसामुळे ग्रामीण भागात दाणादाण उडालीय. लहान नद्यांना, ओढ्यांना पूर आला; तर पिके आडवी झाली आहेत. या वर्षातला सर्वाधिक मुसळधार पाऊस रात्री झाल्याने सगळीकडे पाणीच पाणी झाले. अनेक गावांमध्ये नागरिकांना रात्र जागून काढावी लागली. घरात पाणी शिरले. कन्नड़ तालुक्यातील करंजखेड, चिंचोली, घाटशेन्द्रा भागात पाऊस पूरस्थिती होती. मुसळधार पावसामुळे डोंगराळ भागातून  पावसाच्या पाण्याचा ओघ गावात आला.  नदी नाल्यांना पूर आला. शेतात पाणी साचल्याने पिकांना फटका बसला. गावात गुडघ्याच्याही वर पाणी दिसत आहे. पूर्ण रात्र नागरिकांनी जागून काढली आहे. मराठवाड्यात यावर्षी पावसाने सरासरी ओलांडली. सरासरीच्या १००.८ टक्के पाऊस झालाय. औरंगाबादेत यावर्षी १३७ टक्के पाऊस झालाय. मराठवाड्याची सरासरी ६७९ मिमी आहे. तर आत्तापर्यंत ५८५ मिमी पाऊस झाला. 


हिंगोली । जलेश्वर नदीला पूर, कुरुंदा गावात पाणी घुसले


हिंगोली जिल्ह्यात भल्या पहाटे सलग दोन तासापेक्षा अधिक काळ मुसळधार पावसाने जोरदार बॅटिंग केली. वसमत तालुक्यातील कुरुंदा,डोन वाडा,सुकळी, दाभडी,सिंदगी,सेलू परिसरात पावसाचा जोर दिसून आला. सलग झालेल्या मुसळधार पावसामुळे या परिसरात हाहाकार माजला असून जलेश्वर नदीला पूर आल्याने कुरुंदा गावात या नदीचं पाणी घुसले. यामुळे इथलं जनजीवन विस्कळीत झालं असून नागरिकांच्या संसार उपयोगी वस्तूंच मोठं नुकसान झालंय. कुरुंदा गावातील सखल भागात दोन फुटापर्यंत पाणी आहे,अनेक वाहनं पाण्याखाली गेली असून परिसरात जलाशयाचं स्वरूप आलंय. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून ढग फुटी सदृश्य हा पाऊस असल्याचं तेथील ग्रामस्थांच म्हणणं आहे


परभणी । जिल्ह्यात सर्वदूर जोरदार पाऊस


परभणी जिल्ह्यात मध्यरात्री आणि भल्या पहाटे सर्वदूर जोरदार पाऊस झाला. सेलू तालुक्यातील कुपटा इथे मुसळधार पावसामुळे पूल वाहून गेला. सेलू तालुक्यातील कुपटा गावा शेजारील ओढ्यास पूर आला आल्याने कुपटा गावाचा सकाळपासूनच संपर्क तुटलाय, आता पाणी ओसरत असल्याने पाण्या खालच्या पुलाचा काही वाहून गेलाय तर काही भाग खचलाय, कुपटा गावाला जोडणारा एकमेव रस्ता असून याच रस्त्याने नागरिकांना तालुक्याला आणि जिल्ह्याला येजा करावी लागते, पुल मोठ्या प्रमाणात खचला असून वाहतूक ठप्प झाली . अनेक वर्षांपासून पुलाची उंची वाढविण्याची मागणी ग्रामस्थ करत होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. अखेर आज हा पुल पुराच्या पाण्यात अर्धा वाहून गेला. जिल्ह्यात इतर ही ठिकाणी पावसामुळे पिकांचे अतोनात नुकसान झालंय, तर ओढे नाले नदीला पूर आला.