विदर्भात पुढील 24 तासांसाठी रेड अलर्ट, नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश
विदर्भात पावसाची जोरदार बॅटिंग, पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत
अमर काणे, झी मीडिया, नागपूर : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. विदर्भात देखील पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. सतत जोरदार पडत असलेल्या पावसामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज असल्याचं सांगण्यात येत आहे. चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया येथे पुढील 24 तासांसाठी नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केलाय. तर नागपूर, वर्धा ,भंडारा, अमरावती येथे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे पुढचे काही दिवस नागपुरकरांसाठी जिकरीचे असणार आहेत. ओरिसवर कमी दाबाचे क्षेत्र असल्याने त्याचा प्रभाव विदर्भावर पुढील 4 ते 5 दिवस राहणार आहे. गेल्या 24 तासात विदर्भात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे. नागपूरच्या काही शहरांमध्ये आणि ग्रामीण भागात देखील पावसाने चांगला जोर धरला आहे.
काही भागात मुसळधार पावसाची देखील शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. काही ठिकाणी पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे, म्हणून नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे.
हवामान विभागाच्या 23 स्टेशनमध्ये मुसळधार पावसाची नोंद करण्यात आली आहे.तर गडचिरोलीतील मुलचेरा येथे अतिवृष्टी झालेली आहे. तिथे 156 MM पावसाची नोंद गेल्या 24 तासात झाले असल्याची माहिती नागपूर प्रादेशिक हवामान विभागाचे अधिकारी एम एल साहू यांनी दिली आहे.