नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस, गोदावरीला पूर
नाशकात मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे गोदावरी नदीला पूर आलाय. गुरुवारी रात्रीपासून संततधार पाऊस कोसळत आहे.
नाशिक : जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे गोदावरी नदीला पूर आलाय. गुरुवारी रात्रीपासून संततधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
रात्रीपासून संततधार पाऊस कोसळत असल्याने रामकुंड परिसराला पाण्याचा वेढा पडला आहे. परिसरातील व्यवहार यामुळे ठप्प झाले आहेत. शहराच्या सर्वच भागात पावसाचा जोर कायम असून ठिकठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे.
दरम्यान, उत्तर प्रदेशातील कमी दाबाचा पट्टा आता मध्य प्रदेशकडे सरकला आहे. त्याचवेळी पश्चिम राजस्थान ते पश्चिम बंगालपर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने गुजरातसह महाराष्ट्रात पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. काल दिवसभरात कोकण, गोव्यात बऱ्याच ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्रात मराठवाडा, विदर्भात काही ठिकाणी दमदार सरी बरसल्या. विदर्भातही काही ठिकाणी पाऊस झाला.
गेल्या आठवड्यापासून दडी मारलेल्या पावसाने गेल्या २४ तासांमध्ये रायगड जिल्हयात दमदार हजेरी लावली. जिल्हयातील अलिबाग, नागोठणे, पेण , कर्जत, उरण, खोपोली याभागात रात्री उशिरा पावसाच्या सरी कोसळत होत्या. पावसामुळे अंबा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. नागोठणे शहर आणि परीसरात पूरसदृश्य परीस्थिती निर्माण झाली होती.
नांदेडमध्ये तब्बल २० दिवसानंतर पावसाने दमदार हजेरी लावली. गुरुवारी रात्री जिल्ह्यात दीड तास मुसळधार पाऊस झाला. सायंकाळी सहाच्या सुमारास जिल्ह्यात रिमझीम पाउस सुरु झाला. नंतर रात्री मात्र पावसाचा जोर वाढला.