मुंबई : नवी मुंबईसह ठाणे जिल्ह्यात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. कल्याण डोंबिवलीच्या अनेक भागात पावसामुळे पाणी साचले आहे. मुंबईतही उपनगरात पावसाच्या सरी सुरुच आहे. रस्त्यावर पाणी साचल्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक संथगतीने सुरू आहे. दरम्यान, राज्यात पुढील आठवड्यात पाऊस सक्रिय होणार आहे. मुख्यत: १८ सप्टेंबरनंतर राज्यात बहुतांश भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुण्यात पुढील आठवड्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच मान्सूनच्या परतीचा प्रवासही सरु होणार आहे. १७ सप्टेंबरनंतर राजस्थानमधून हा परतीचा पाऊस सुरु होईल. त्यासाठी पोषणक वातावरण तयार होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या वातावरणातील बदलांमुळे अजूनही पाऊस सक्रीय आहे. याचा परिणाम हा परतीच्या पावसावर झाला आहे. सलग तिसऱ्या वर्षी मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला यंदा विलंब झाला आहे. अजून राजस्थानमध्ये पावसाच्या हलक्या सरी हजेरी लावत आहेत. इतर राज्यांमध्येही पावसाचा जोर कमी जास्त होत आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार साधारणत: १ ते ६ सप्टेंबरच्या दरम्यान राजस्थानच्या पश्चिम भागातून परतीच्या मान्सूनला सुरुवात होते. मात्र, तेथे अजूनही पाऊस सुरु आहे. त्यामुळे परतीच्या पावसाला विलंब झाला आहे.


१५ सप्टेंबरपर्यंत राजस्थान, पंजाब, कच्छच्या काही भागातून मान्सून बाहेर पडतो. यानंतर आठवडाभरात महाराष्ट्रातील पाऊस थांबतो. देशभरातून ३० सप्टेंबरपर्यंत मान्सून माघारी फिरतो. यंदा अनुकूल वातावरणामुळे पावसाने अद्याप विश्रांती घेतलेली नाही. यंदा मान्सून उशिरा दाखल झाला. मात्र, पावसाने आपली सरासरी भरुन काढली आहे. तसेच अजूनही पाऊस पडत आहे. राज्यात गणेशोत्सवातही पाऊस सक्रिय होता. त्यानंतरही पाऊस पडत आहे.