पुणे : पुण्यात काल रात्री ढगफुटीसदृष झालेल्या पावसाने दाणादाण उडवून दिली आहे. पुण्यात एका रात्रीत पावसाने १० बळी घेतले आहेत. सलग २ तासाच्या पावसानं शहर आणि परिसरात अक्षरश: कहर केला. विशेष करून कात्रज, आंबेगाव तसेच सिंहगड रोड परिसरातील ओढे नाले ओव्हरफ्लो होऊन त्यांचं पाणी वस्त्यांमध्ये शिरलं. अनेक सोसायट्या तसेच झोपडपट्टी भागांत पाणी शिरलं. रस्ते पाण्याखाली जाऊन त्यांना ओढ्याचं स्वरुप आलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुण्यात पावसाने सर्वाधिक नुकसान केलं ते दुचाकी आणि चारचाकींचं. ज्याप्रमाणे मुंबईकरांना लोकल गाडीचं महत्त्व तसंच पुणेकरांना आपल्या दुचाकी चारचाकीचं महत्त्व. पुण्यात गल्लोगली, इमारतींच्या पार्किंगमध्ये जिथे जागा मिळेल तिथे रात्री दुचाकी चारचाकी पार्क केलेल्या असतात. ढगफुटीसदृष पावसाने पुण्यात हाहाकार उडवून दिला. रस्त्यांना, गल्ल्यांना दुथडी वाहणाऱ्या नद्याचं स्वरूप प्राप्त झालं. त्यामुळे दुचाकी, चारचाकी गाड्या अक्षरशः वाहून गेल्या. सोसायट्यांमध्ये सकाळी गाड्य़ा पावसामुळे एकमेकांवर चढल्याचं दृष्य होतं. शेकडो वाहनं पावसाच्या पाण्याने वाहून गेली. शेकडो वाहनं नादुरूस्त झाली आहेत. विविध ठिकाणी अडकून पडलेल्या गाड्या बाहेर काढणं हे आता प्रशासनासमोर आणि नागरिकांसमोर आव्हान आहे. पुण्यातल्या ट्रेझर पार्क सोसायटीच्या पार्किंगमध्ये पाणी शिरलय. सुमारे ७०० गाड्या पाण्याखाली अडकल्या आहेत.


पाण्याचा प्रवाह एवढा होता की गाड्या ढकलल्या जात नव्हत्या. गल्ली बोळातून आणि अंतर्गत रस्त्यांवरूनही खूप मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होतं. पुण्यातल्या बिबवेवाडी परिसरात रेकॉर्डब्रेक पाऊस झाला आहे. रात्री ८ ते ११ या तीन तासात ११२  मिमी पावसाची नोंद झाली. यंदाच्या पर्जन्यमानानं २४ तासाच्या काळात शंभरी ओलांडण्याची ही पहिलीच वेळ होती.


पुणे सातारा महामार्गावरील नविन कात्रज बोगद्याजवळ दरड कोसळल्यानं या मार्गावरील वाहतूक ठप्प आहे. रस्त्यावर पाण्याचा प्रवाह तीव्र असल्यामुळे त्यावर वाहनं न नेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय. बिबवेवाडी महेश सोसायटी चौकात नदीला पूर आल्याप्रमाणे पाणी उसळत होतं.