भंडारा : भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात आग लागल्याच्या घटनेत १० नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेची चौकशी करून दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच पीडितांना १० लाखांची मदत जाहीर करा अशी मागणीही फडणवीसांनी केली आहे. भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या इलेक्ट्रीक ऑडीटची मागणी वारंवार करूनही ऑडीट करण्यात आलं नाही असा आरोप भाजप नेते चंद्रशेखऱ बावनकुळे यांनी केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जिल्हा सामान्य रूग्णालयात दुर्घटना घडली तेव्हा तिथे २ नर्स आणि सहाय्यक कर्मचारी असल्याचा दावा जिल्हाधिकाऱ्यांनी केलाय. घटनेच्या चौकशीचे आदेश दिल्याची माहिती त्यांनी दिली आहे. भंडाऱ्यातील अपघानंतर प्रशासन खडबडून जागं झालं आहे. ही दुर्घटना कशामुळे घडली त्याची उच्च स्तरीय चौकशी केली जाणार आहे. तसंच राज्यातील सर्व हॉस्पिटल्सचे ऑडिट करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे.


भंडारा जिल्हा रुग्णालयातल्या घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींसह केंद्रीय मंत्री आणि राजकीय नेत्यांनी ट्विटद्वारे दुर्दैवी घटना असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. शनिवारी मध्यरात्री २ वाजता  जिल्हा सामान्य रूग्णालयात लागलेल्या आगीत १० नवजात बालकांचा मृत्यू झाला. नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागात ही आग लागली होती. यावेळी ७ बालकांना वाचवण्यात यश आलं आहे.


भंडारा जिल्हा रूग्णालय आगप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी तात्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत. घटनेबाबत मुख्यमंत्र्यांनी तीव्र शोक व्यक्त केलाय. पीडित पालकांना मुख्यमंत्र्यांनी ५ लाखांची मदत जाहीर केलीय. आरोग्यमंत्री, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्याशीही मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली. कोणत्याही हलगर्जीपणावर कठोर कारवाई होईल असं आरोग्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.