तिवरे धरण फुटल्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांकडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश
१५-१७ वर्षातच धरण फुटत असेल तर ही एक गंभीर गोष्ट आहे. तिवरे धरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
रत्नागिरी : १५-१७ वर्षातच धरण फुटत असेल तर ही एक गंभीर गोष्ट आहे. तिवरे धरणाची दुरूस्ती मे महिन्यात केली होती, तरीही धरण का फुटले याची पूर्ण चौकशी केली जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. जवळच समुद्र असल्याने आम्ही कोस्ट गार्डलाही पाचारण केले आहे, असे महाजन यांनी सांगितले. दरम्यान, चिपळूण तालुक्यातील तिवरे गावातील धरण फुटल्याने १२ ते १५ घरे वाहून गेली आहेत. या दुर्घटनेमध्ये ९ जणाचा मृत्यू झाला. तर १५ जण बेपत्ता झाले आहेत. या दुर्घटनेला सर्वस्वी पाटबंधारे विभाग जबाबदार असल्याचा आरोप या दुर्घटनेत बेपत्ता झालेल्यांच्या नातेवाईकांनी केला आहे.
तिवरे धरण फुटून झालेल्या दुर्घटनेतील जीवितहानीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. या संदर्भातील मदतकार्याचा सातत्याने आढावा घेण्यात येत असून या घटनेस जबाबदार असलेल्या कारणांचा शोध घेऊन संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. या घटनेचे वृत्त कळताच मुख्यमंत्र्यांनी तातडीने प्रशासकीय यंत्रणेशी संपर्क साधून मदत कार्याबाबत सूचना दिल्या आहेत.
कारण गेली २ वर्षे या धरणाला गळती लागली होती. याबाबत वारंवार प्रशासनाकडे तक्रारी करण्यात आल्या. मात्र, केवळ मलमपट्टी या गळतीवर करण्यात आली. त्यामुळे या दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी नातेवाईकांकडून होत आहे.
या घटनेला स्थानिकांनी प्रशासनाला जबाबदार घरले आहे. आम्ही वारंवार पत्रव्यवहार करूनही पाटबंधारे विभागाने दुर्लक्ष केल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. मंगळवारी रात्री ९ च्या दरम्यान माणसं जेवायला बसली होती, ती तशीच वाहून गेली. प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरू आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातल्या दुर्घटनाग्रस्त तिवरे धरणाबाबत आणखी एक धक्कादायक माहिती समोर आलीय. चिपळूणचे शिवसेनेचे विद्यमान आमदार सदानंद चव्हाण हेच याच धरणाचे ठेकेदार असल्याचं उघड झाले आहे. त्यांच्या खेमराज कन्स्ट्रक्शन कंपनीनं हे धरण बांधलं होतं. केवळ २० वर्षांत हे धरण फुटल्यामुळे हे काम निकृष्ट दर्जाचे करण्यात आल्याचं स्पष्ट झाले आहे. मात्र याची डागडुजी व्यवस्थित न झाल्यामुळे धरण फुटल्याचा दावा आमदार सदानंद चव्हाण यांनी केला आहे. तर कोकणातल्या धरणांमध्ये काळ्या मातीचा वापर न केल्यामुळे धरण फुटल्याचं निवृत्त अभियंते विजय पांढरे यांनी सांगितले आहे.
तिवरे धरणाचं काम हे खेमराज कंपनीनं कन्स्ट्रक्शनने केले असून ही कंपनी चिपळूणचे विद्यमान आमदार सदानंद चव्हाण यांची आहे याठिकाणी काही ग्रामस्थांनी या बाबत आरोप केला आहे. धरण फुटण्यामागे ठेकेदार देखील दोषी आहे त्याच्यावर देखील कारवाई करण्याची मागणी इथले स्थनिक करत आहेत.