Crime News : औंढा नागनाथ पोलिसांची मोठी कारवाई, कोट्यवधी रुपयांचा बनावट नोटा जप्त
Crime News : पोलिसांनी या प्रकरणी नऊ आरोपींना अटक केली असून यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरु केला आहे
गजानन देशमुख, झी मीडिया, हिंगोली : हिंगोलीच्या (Higoli News) औंढा नागनाथ (Aundha Nagnath) पोलिसांना (Higoli Police) बनावट नोटा चलनात (fake currency) आणणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. पेट्रोलिंग करत असताना संशय आल्याने पोलिसांनी तपास करत बनावट नोटा तयार करणाऱ्या टोळीला ताब्यात घेतले आहे. चौकशी केल्यानंतर तब्बल कोटींपेक्षाही जास्त रकमेच्या बनावट नोटा छापल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी नऊ जणांना अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे.
या टोळीतील नऊ जणांना पोलिसांनी अटक केली असून यात एका महिलेचा ही समावेश आहे. या टोळीकडून तब्बल 1 कोटी 14 लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे यातील आरोपी आपण श्रीमंत असल्याचा बनाव करण्यासाठी बेंटेक्सचे सोने अंगावर घालून फिरत असत. बुधवारी रात्री औंढा शहरातील शासकीय रुग्णालयाजवळ काहीजण आप आपसात भांडत असल्याचे पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांना दिसून आले. पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांच्या बॅगमध्ये पाचशेच्या नोटा आढळल्या.
1 लाख रुपये देऊन त्याबदल्यात बनावट 3 लाख रुपये देत फसवणूक केली जायची अशी या टोळीची कामाची पद्धत होती. या प्रकरणात औंढा येथून 6 जण तर खामगाव येथून तीन असे एकूण नऊ आरोपींना पोलिसांनी अटक करण्यात आलीय. आरोपीकडून एक कोटी 14 लाखच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. मुख्य आरोपी औरंगाबादचा असल्याचे औंढा नागनाथ असल्याचे पोलिसांनी सांगितले. तर इतरा आरोपी हे औरंगाबाद, नांदेड, लातूर या भागातील आहेत. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.
नाकाबंदीत गाडी सापडली अन्....
"1 फेब्रुवारी रोजी पेट्रोलिंग करताना, 9.30 ते 10च्या दरम्यान सरकारी दवाखाना रोडवर काही जण वाद घालताना दिसून आले. तेव्हा पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली. यावेळी औरंगाबादच्या मुज्जफर नजीम शेख नावाच्या महिलेकडे एक बॅग होती. या महिलेच्या वागण्यात संशय वाटल्याने तिला पोलीस ठाण्यात आणण्यात आले. यानंतर बॅग तपासली असता 49 लाखांच्या बनावट नोटा आढळून आल्या. महिलेने सांगितले की, साडेबारा लाख दिल्यानंतर मला या नोटा देण्यात आल्या आहेत. अधिक चौकशी केली असता महिला उडवाउडवीची उत्तरं द्यायला लागली. यावेळी केशव वाघमारे यांनी हे षडयंत्र असल्याचे सांगत एक लाखांचे तीन लाख मिळतात ही माहिती विनोद शिंदे नावाच्या व्यक्तीने दिली होती. ही व्यक्ती त्या महिलेच्या संपर्कात होता. मिळालेल्या माहितीवरुन आम्ही लातूर येथे जाऊन परमार नावाच्या व्यक्तीची चौकशी केली आणि वरिष्ठांना यासंदर्भात माहिती दिली. त्यानंतर संपूर्ण जिल्हाच्या सीमेवर नाकाबंदी लावण्यात आली. यावेळी एक फॉर्च्युनर गाडी वेगाने जात असल्याची माहिती मिळताच त्याची माहिती नाकाबंदीवर असणाऱ्या अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर गाडीला थांबवून ड्रायव्हरला ताब्यात घेण्यात आले," अशी माहिती औढ्यांचे सहायक पोलीस निरीक्षक विषवनाथ झुंजार यांनी दिली.